ऑनलाईन टीम / बगदाद :
इराणच्या बुशहर शहरात आज सकाळी 7.50 वाजता भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. 4.9 रिश्टर स्केल एवढी या भूकंपाची तीव्रता असल्याची माहिती अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेने दिली आहे.
या भूकंपाचे धक्के हे नैसर्गिकरित्या आलेल्या भूकंपाचे धक्के होते. त्यामुळे अमेरिका-इराणमध्ये झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा त्याच्याशी कोणताही संबंध नाही. इराणच्या अणुऊर्जा केंद्राजवळच हा भूकंप झाला आहे. या भूकंपामुळे कोणती हानी झाल्याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.
आज सकाळी इराकमधील अमेरिकी लष्कराच्या हवाईतळावर इराणने 12 क्षेपणास्त्र डागली आहेत. त्या हल्ल्याचे हे हादरे असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, हे हल्ले हल्ल्याचे नसून भूकंपाचे असल्याचे अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेकडून सांगण्यात आले.
या हल्ल्यात इराणने इराकमधील अमेरिकेच्या दोन लष्करी तळांना लक्ष्य केले होते. मात्र, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अमेरिकी अधिकाऱयांनी दिली आहे. तर इराणने या हल्ल्यात अमेरिकेचे 30 जवान मारले गेल्याचा दावा केला आहे.