अफगाणिस्तानमधील पहिल्या प्रांतीय राजधानीवर नियंत्रण
वृत्तसंस्था/ काबूल
अफगाणिस्तानातील तालिबानची दहशत वाढत चालली आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी काबूलमध्ये अफगाणिसतान सरकारच्या माहिती केंद्राच्या संचालकाची हत्या केली आहे. याचबरोबर अफगाण-इराण सीमेवरील जरांजवर कब्जा केला आहे. अफगाणिस्तानच्या निम्रूज प्रांताची जरांज राजधानी आहे.
अफगाण सैन्याच्या 215 वे कोरकडे जरांज आणि लष्करगाहच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. सैन्याचे स्वतःचे लक्ष लष्करगाहच्या सुरक्षेवर केंद्रीत केले होते. याचमुळे तालिबानला जरांजवर सहजपणे कब्जा करता आला. निम्रूजचे डेप्युटी गव्हर्नर रोहगुल खैरजाद आणि प्रांतीय परिषदेचे प्रमुख हाजी बाज मोहम्मद नासर यांच्यानुसार जरांज शहराचे मोठे नुकसान झाले आहे. तालिबानने अनेक शहरांना घेरले आहे. 1 लाख 60 हजार लोकसंख्या असलेले जरांज शहर ताब्यात घेणे हे तालिबानचे पहिले मोठे यश आहे.
सरकारी अधिकाऱयांचे पलायन
तालिबानच्या भीतीने लोक स्वतःच्या घरांमध्ये लपले आहे. तालिबानने कुठल्याही लढाईशिवाय शहरावर कब्जा केला आहे. तालिबानशी झालेल्या तडजोडीनुसार शासकीय अधिकाऱयांना पलायन करण्याची अनुमती मिळाल्याची माहिती प्रांतीय परिषदेचे सदस्य खैर-उल-निसा गामी यांनी दिली आहे.
तालिबानकडून लूट
कांग जिल्हय़ावर दहशतवाद्यांनी कब्जा केल्यावर अधिकाऱयांनी जरांजमधून पळ काढण्यास प्रारंभ केला. तालिबानने शहरातील शासकीय कार्यालये आणि व्यवसायांची लूट सुरू केली आहे. अफगाण वायुदलाच्या विमानाने शहरावरून घिरटय़ा घातल्या पण नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करत हल्ला करणे टाळले आहे.
कंधार अन् हेरातमध्ये लढाई
उत्तर अफगाणिस्तानात तालिबानने प्रांतीय राजधानी शेबर्गनवर हल्ला केला आहे. तालिबानने घरे आणि सामुदायिक भवन पेटवून देत पोलीस मुख्यालय तसेच तुरुंगावर हल्ला केला आहे. याचबरोबर दक्षिणेत कंधार शहर आणि अन्य प्रांतीय राजधानींपैकी एक हेरात शहरातही लढाई सुरू आहे.