नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये सामील होणारा मल्ल बजरंग पुनिया व महिला नेमबाज इलावेनिल वलरिवन यांना एफआयसीसीआय भारत क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोरोना महामारीच्या संकटामुळे आभासी कार्यक्रमाद्वारे हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
2019-20 या मोसमात बजरंग व वलरिवन यांनी प्रभावी कामगिरी केली असून त्यांनी आपापल्या क्रीडा प्रकारात वर्षातील सर्वोत्तम क्रीडापटूचा पुरस्कार जिंकला आहे. फ्रीस्टाईल मल्ल बजरंग सध्या अमेरिकेत सराव करीत असून हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला आहे. ‘भविष्यात सर्वोत्तम कामगिरी करून देशासाठी जास्तीत जास्त पदके मिळवून देणे हेच माझे यापुढेही ध्येय राहील. अशा पुरस्कारामुळे आणखी सरस प्रदर्शन करण्याची प्रेरणा मिळते. याप्रसंगी मी अन्य पुरस्कारविजेत्यांचेही अभिनंदन करतो,’ अशा भावना बजरंगने व्यक्त केल्या.
‘प्रत्येक वेळी माझ्या पाठिशी राहिलेल्या माझ्या कुटुंबियांचे मी सर्वप्रथम आभार मानते. तसेच माझे मार्गदर्शक गगन नारंग, प्रशिक्षक नेहा चौहान यांनी माझ्यावर कायम विश्वास दाखविला, त्याबद्दल त्यांचीही मी आभारी आहे. राष्ट्रीय रायफल संघटनेनेही मला खूप पाठिंबा दिला आणि कठीणसमयी आधार दिला, त्यांचे तसेच मला सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या भारतीय क्रीडा प्राधिकरणचीही मी आभारी आहे,’ अशा भावना इलावेनिलने व्यक्त केल्या.
भारतीय कुस्ती फेडरेशन व भारतीय पॅरालिम्पिक समिती यांना सर्वोत्तम राष्ट्रीय क्रीडा फेडरेशनचा पुरस्कार संयुक्तपणे देण्यात आला तर सुंदर सिंग गुर्जर व सिमरन शर्मा यांना संयुक्तपणे वर्षातील सर्वोत्तम पॅराऍथलीटचा पुरस्कार मिळाला. वर्षातील सर्वोत्तम प्रशिक्षकाचा पुरस्कार ऍथलेटिक्स कोच राधाकृष्णन नायर यांनी
पटकावला.
टेनविक स्पोर्ट्स या कंपनीला खेळाला प्रोत्साहन देणाऱया सर्वोत्तम कंपनीचा पुरस्कार देण्यात आला असून या कंपनीच्या वतीने माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.