वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सध्याला इलेक्ट्रिक कार्सचे वाढते महत्त्व लक्षात घेता आता यात हय़ुंडाईने उडी घेतल्याचे दिसते आहे. अमेरिकेतील स्मार्टफोन निर्माती कंपनी ऍपल इंकने याकरीता दक्षिण कोरियातील कंपनी हय़ुंडाई मोटरसोबत भागीदारी करण्याचे निश्चित केले आहे.
दोन्ही कंपन्यांकडून येत्या मार्चमध्ये करारावर स्वाक्षरी केल्या जाणार आहेत. दोन्ही कंपन्या संयुक्त विद्यमातून 2024 मध्ये अमेरिकेत इलेक्ट्रिक कार्सचे उत्पादन घेणार असल्याचे सांगण्यात येते. गेल्या शुक्रवारी हय़ुंडाईने याबाबत सुतोवाच केले होते. ऍपलसोबत इलेक्ट्रिक कार निर्मिती करण्याबाबत प्रारंभिक स्वरूपाची चर्चा सुरू असल्याचे हय़ुंडाईने म्हटले होते. 2027 पर्यंत हय़ुंडाई मोटर आणि ऍपल यांच्याकडून एकत्रितपणे सेल्फ ड्राइव्हिंग इलेक्ट्रिक कार निर्मिती करण्याचीही शक्यता सांगितली जात आहे. या बातमीनंतर शेअर बाजारात हय़ुंडाईचे भाव चढले होते.
वर्षाला 1 लाख कार्सचे उत्पादन
सदरचे इलेक्ट्रिक कार्सचे उत्पादन जॉर्जियातील किया मोटर्सच्या कारखान्यातून घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. किया मोटर्स ही हय़ुंडाई मोटर्सची सहकारी कंपनी आहे. आणखी एका योजनेनुसार कंपनी अमेरिकेत इलेक्ट्रिक कार्सकरीता स्वतंत्र कारखाना बांधणार आहे. नव्या कारखान्यातून 2024 पासून वर्षाला 1 लाख इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती होणार आहे.