वृत्तसंस्था/ बेंगळूर
वर्ष 2021 हे आता संपण्याच्या मार्गावर आहे. पेट्रोल आणि डिझेल इंधनावरील वाहनांकरिता हे वर्ष चांगले गेले नाही. चीपच्या तुटवडय़ामुळे ऑटो कंपन्यांना मोठय़ा प्रमाणात या वषी नुकसान झेलावे लागले आहे तर दुसरीकडे मात्र इलेक्ट्रिक गाडय़ांनी भारतीय बाजारामध्ये आपली लोकप्रियता अधिक वाढवली असल्याचे दिसून आले आहे. हिरो इलेक्ट्रिकने इलेक्ट्रिक दुचाकीच्या क्षेत्रामध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे. त्यांच्या वाहनांना मागच्या महिन्यात चांगला प्रतिसाद लाभल्याचे दिसले आहे. याला लागून इतरही कंपन्या आता इलेक्ट्रिक दुचाकी आणण्यासाठी लगबगीनं तयारीला लागल्या आहेत.
कोरोनाच्या काळात 2020 मध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीमध्ये 26 टक्के इतकी घसरण दिसली होती. पण नंतर जानेवारी ते नोव्हेंबर या काळामध्ये भारतात इलेक्ट्रिक वाहनांनी आपली मजबूत कामगिरी दर्शवली आहे. देशभरात आता छोटय़ा मोठय़ा प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांच्या लाँचिंगचे कार्यक्रम होत आहेत. वाहन क्षेत्रातील तज्ञांच्या मते नव्या वषी म्हणजे 2022 मध्ये इलेक्ट्रिक वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे नववर्ष हे इलेक्ट्रिक वाहनांचे वर्ष असेल असा अंदाज वर्तवला जात आहे. नव्या वर्षी दुचाकीसह चारचाकी वाहनांचे लाँचिंग वाढणार आहे.
दुचाकींचा दबदबा वाढणार
नव्या वषी भारतीय रस्त्यांवर इलेक्ट्रिक वाहनांचाच अधिक दबदबा राहणार असल्याचीही शक्मयता सांगितली जात आहे. ओला, ऍथर यासारख्या दिग्गज कंपन्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकींची संख्या हळूहळू वाढत असून या अनुषंगाने आता इतर छोटय़ा मोठय़ा कंपन्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकी भारतामध्ये अधिक प्रमाणात वाढताना दिसत आहेत.
बॅटरीची किमत होणार कमी
त्याचप्रमाणे बॅटरीच्या निर्मितीसाठी येणाऱया खर्चामध्ये कपात होत असल्याची एक दिलासादायक बाब समोर आली आहे. बॅटरीची किंमत भविष्यकाळात कमी होत गेल्यास दुचाकी घेणाऱयांची संख्या आपोआपच वाढताना दिसणार आहे. अशा प्रकारच्या बॅटरी निर्मितीकरिता सवलत देण्याचे सरकारने घोषित केले आहे. येत्या काळात बॅटरीनिर्मिती भारतातच करण्याला प्राधान्य देण्यासाठी कंपन्या पुढे येतील, असे सांगितले जाते. चार्जिंग स्टेशनच्या संख्येतही वाढ करण्याच्यादृष्टीने टाटा पॉवरसह इतर मोठय़ा कंपन्यांनी एचपीसह इतर तेल कंपन्यांशी भागीदारी केल्या आहेत.
विक्रीत दिसली वाढ
या वषी नोव्हेंबरपर्यंत दुचाकी वाहनांची विक्री 4.6 टक्के इतकी वाढली आहे, म्हणजेच जवळपास 1 लाख 26 हजार 813 इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री झाली असल्याची माहिती आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या तुलनेमध्ये आता इलेक्ट्रिक दुचाकीचा पर्याय ग्राहकांना सही वाटू लागला आहे. अनेक स्टार्टअप कंपन्या या आता दुचाकी निर्मितीमध्ये उतरल्या आहेत.