प्रतिनिधी/ कराड
स्वच्छ सर्वेक्षण 2021 च्या अनुषंगाने कराड नगरपरिषदेने मोठय़ा प्रमाणात जनजागृती सुरू केली असून एक आगळावेगळा उपक्रम राबविला आहे. पर्यावरणाच्या दृष्टिने उपयुक्त असणाऱया विद्युत वाहनांसाठी मोफत चार्जिंग पॉईंट पालिकेच्या प्रांगणात सुरू करण्यात आला आहे. याचा लाभ इलेक्ट्रीक वाहनधारक घेत असून त्यांनी या उपक्रमाबद्दल पालिकेचे कौतुक केले आहे.
स्वच्छ सर्वक्षण 2021 मध्ये गत दोन वर्षाप्रमाणे याही वर्षी देशात प्रथम क्रमांक मिळवण्याचा संकल्प कराड नगरपरिषदेने केला आहे. या अनुषंगाने दैनंदिन उपक्रम सुरू आहेत. शहरात स्वच्छतेविषयी प्रबोधनपर जनजागृती कार्यक्रम सुरू असून माझी वसुंधरा अभियानांतर्गत विविध उपक्रम हाती घेतले आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड आणि प्रदूषण टाळणे, इंधन बचत व्हावी, यासाठी शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त विद्युत वाहनांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे. शहरातील जे नागरिक विद्युत वाहनाचा वापर करतील, त्यांना सहज सुलभ विद्युत वाहनांसाठी मोफत चार्जिंग पॉईंट सुरू करण्यात आलेला आहे. विद्युत वाहन चालक मोफत चार्जिंग पॉईंटचा लाभ घेत आहेत. नगरपरिषदेने सुरू केलेल्या या मोफत चार्जिंग पॉईंटबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानामध्ये पर्यावरण समतोलासाठी विविध उपाययोजना करणेबाबत राज्य शासनाच्या सूचना आहेत. या अनुषंगाने चार्जिंग पॉईंट सुरु केलेला आहे.