वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसी टी-20 ताज्या फलंदाजांच्या मानांकन यादीत भारताचा सलामीचा फलंदाज इशान किशनने सातव्या स्थानावर झेप घेतली. बुधवारी आयसीसीतर्फे ताजी मानांकन यादी जाहीर करण्यात आली.
मंगळवारी झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱया टी-20 सामन्यात इशान किशनने शानदार फलंदाजी केली होती. या कामगिरीमुळे त्याने या ताज्या फलंदाजांच्या मानांकन यादीत सातव्या स्थानावर झेप घेतली. टी-20 गोलंदाजांच्या मानांकन यादीत भारताचे भुवनेश्वर कुमार आणि यजुवेंद्र चहल यांच्या मानांकनातही सुधारणा झाली.
इशान किशनचे मानांकन 68 अंकांनी वधारले. फलंदाजांच्या मानांकन यादीत पहिल्या दहा फलंदाजांमध्ये भारताचा 23 वषीय इशान किशन हा एकमेव फलंदाज आहे. केएल राहुल 14 व्या स्थानावर आहे. कर्णधार रोहित शर्मा 16 व्या तर श्रेयस अय्यर 17 व्या, कोहली 21 व्या स्थानावर आहे. गोलंदाजांच्या मानांकन यादीत भुवनेश्वर कुमार 11 व्या तर चहल 26 व्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या हॅझलवूडने अग्रस्थान मिळविले आहे. लंकेचा महिश तिक्षणा 8 व्या स्थानावर आहे.
कसोटी मानांकनात गोलंदाजांच्या यादीत भारताचा बुमराह तिसऱया स्थानावर आहे. रविचंद्रन अश्विनने आपले दुसरे स्थान कायम राखले आहे. अष्टपैलूंच्या यादीमध्ये रविंद्र जडेजा आणि अश्विन यांनी आघाडीचे दोन क्रमांक कायम ठेवले आहेत. इंग्लंडचा जो रुट फलंदाजांच्या मानांकन यादीत पुन्हा पहिल्या स्थानावर आहे. रोहित शर्मा 7 व्या तर कोहली 10 व्या स्थानावर आहे.