संबंधितांवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी : हिंडलगा ग्रा. पं. च्या भूमिकेकडे लक्ष
वार्ताहर /हिंडलगा
हिंडलगा ग्राम पंचायत कार्यक्षेत्राला कचऱयापासून मुक्त ठेवण्याच्या उद्देशाने काही दिवसांपूर्वीच पंचायत कार्यालयात बैठक घेऊन रस्त्याकडेला कचरा टाकताना सापडल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा व्यापारी व ग्रामस्थांना देण्यात आला होता. तरीदेखील काही लोकांनी या इशाऱयाला न जुमानता पुन्हा रस्त्याकडेलाच कचरा टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
बेळगाव-वेंगुर्ला राज्य महामार्ग हा हिंडलगा गावच्या मधोमध गेला असल्याने पश्चिम भागातून बेळगावला येणाऱया वाहनधारकांची याच रस्त्यावरून मोठय़ा प्रमाणात वर्दळ सुरू असते. पण गेल्या काही वर्षांपासून मिलिटरी विनायक मंदिरापासून हिंडलग्यापर्यंत जोडणाऱया मुख्य रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिक व परिसरातील रहिवासी मोठय़ा प्रमाणात सुका व ओला कचरा टाकून गलिच्छ वातावरण तयार करत आहेत. याचा नाहक त्रास रहिवासी व वाहनधारकांना सहन करावा लागत होता. रस्त्याच्या बाजूलाच पडलेल्या कचऱयातील शिल्लक मांस व अन्नपदार्थ खाण्यासाठी मोकाट कुत्री व डुकरांचा मुक्त संचार वाढला आहे. काहीवेळा रस्त्यावर कुत्रे आडवे आल्याने वाहनधारकांना अपघातांच्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. तर आजूबाजूच्या नागरिकांना तीव्र दुर्गंधीबरोबरच गलिच्छ वातावरणाचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत दैनंदिन तक्रारी वाढू लागल्याने ग्राम पंचायत अध्यक्ष नागेश मनोळकर यांनी पंचायत कार्यालयात बैठक घेऊन गावातील व्यावसायिक व ग्रामस्थांनी कचरा रस्त्याकडेला न टाकता पंचायतीच्या कचरा गाडीकडे देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. याशिवाय कोणीही कचरा टाकताना सापडल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. त्यानंतर काही दिवस नागरिकांनी रस्त्याच्या बाजूला कचरा टाकण्याचे टाळले होते. पण गेल्या काही दिवसांपासून काहींनी रस्त्याकडेला पुन्हा कचरा टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पंचायतीच्या इशाऱयाला केराची टोपली दाखविण्याचा प्रकार नागरिकांनी केला आहे. त्यामुळे संबंधित बेजबाबदार लोकांवर ग्राम पंचायत कोणती कारवाई करणार? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे..