वृत्तसंस्था/ पणजी
केरळ ब्लास्टर्सचे साहाय्यक प्रशिक्षक इश्फाक अहमद यांना या संघाच्या हंगामी प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयएसएलमधील त्यांचे अजून दोन सामने बाकी असून त्यांचे आव्हान याआधीच संपुष्टात आले आहे.
मंगळवारी हैदराबाद एफसीकडून केरळ ब्लास्टर्स संघाला 0-4 असा नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागल्याने ओगेकूच करण्याच्या त्यांच्या आशा संपुष्टात आल्या. त्यानंतर बुधवारी प्रमुख प्रशिक्षक किबू विकुना यांच्याशी ब्लास्टर्स क्लबने परस्पर संमतीने फारकत घेण्याचा निर्णय जाहीर केला. ‘परस्पर संमतीने आम्ही विकुना यांच्याशी फारकत घेतली असून त्यांनी संघासाठी केलेल्या योगदानाद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. साहायक प्रशिक्षक इश्फाक अहमद यांनाच तात्पुरती बढती देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. शेवटच्या दोन सामन्यात ते संघाचे हंगामी प्रमुख प्रशिक्षक म्हणून काम पाहतील,’ असे क्लबने ट्टिवट केले आहे. केरळ ब्लास्टर्सने आयएसएलच्या या मोसमात 18 पैकी केवळ 3 सामने जिंकले आहेत. गुणतक्त्यात ते दहाव्या स्थानावर आहेत.