पीव्ही सिंधूच्या ऐतिहासिक यशानंतर विरेंद्र सेहवागचे ट्वीट, कांस्यजेत्या सिंधूवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव
टोकियो / वृत्तसंस्था
‘इसाई-मुस्लिम-सिख-हिंदू, सबको जोडे पीव्ही सिंधू’, असे ट्वीट करत विरेंद्र सेहवागने ऑलिम्पिक कांस्यजेत्या पीव्ही सिंधूचे अभिनंदन केले आणि जणू अवघ्या देशवासियांच्या भावना आपल्या ट्वीटमध्ये शब्दबद्ध केल्या. सिंधूने ऐतिहासिक कांस्य जिंकताच देशभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. राष्ट्रपती राम नाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गजांनी सिंधूचे खास अभिनंदन केले.
सिंधूने चीनच्या जागतिक क्रमवारीतील नवव्या मानांकित हे बिंग जियाव हिच्याविरुद्ध कांस्यपदकासाठी झालेल्या प्ले-ऑफ लढतीत 21-13, 21-15 अशा सरळ गेम्सध्ये पराभूत करत कांस्यपदकावर आपली मोहोर उमटवली.
पीव्ही सिंधू ही दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी केवळ दुसरी भारतीय खेळाडू असून यापूर्वी सुशील कुमारने असा पराक्रम गाजवला. त्याने 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य तर 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाची कमाई केली होती.
सिंधूची प्रतिस्पर्धी चीनची जियाव हिने यापूर्वी झालेल्या 15 लढतीत 9 वेळा सिंधूला पराजित केले होते. मात्र, ही मालिका सिंधूने खंडित करत धमाकेदार विजय नोंदवला. वास्तविक, चायनीज तैपेईच्या तई त्झू यिंग हिच्याविरुद्ध उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागल्यानंतर येथे प्ले-ऑफमध्ये लढणे आणखी आव्हानात्मक होते. मात्र, सिंधूने त्या पराभवाच्या वेदना बाजूला ठेवल्या आणि जियावला पराभूत करत ऐतिहासिक कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केले.
येथील पहिल्या गेममध्ये सिंधूने 4-0 अशी प्रारंभीच आघाडी घेतली. मात्र, बिंग जियावने अँगल्ड रिटर्न व फ्लॅट पुशेसच्या बळावर सिंधूला अडचणीत आणण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरु ठेवला. जियाव हिच्याकडून टॉस मिळाल्यानंतर सिंधूने वेळ घेत मारलेले स्मॅशचे जोरदार फटके तिचे आक्रमक इरादे दाखवून देणारे होते.
सिंधूने पहिल्या ब्रेकवेळी घेतलेली 11-8 ही आघाडी नंतर आणखी भरभक्कम केली आणि हा पहिला गेम 21-13 अशा सहज फरकाने जिंकला. एण्ड चेंज झाल्यानंतर तुलनेने दुसरा गेम अधिक रंगला. यावेळी जियावची झुंज स्पृहणीय ठरत होती. जियावने एकवेळ मोमेन्टम आपल्या बाजूने असेल, याची काटेकोर काळजी घेण्यास सुरुवात केली होती. पण, सिंधूने हाफ स्मॅशेसवर अधिक भर दिला आणि जियावचे सारे गेमप्लॅन उधळून लावले.
या गेममधील ब्रेकदरम्यान सिंधूकडे 3 गुणांची आघाडी होती आणि ती पहिल्या गेममध्ये येथेही आणखी भरभक्कम केली. सिंधूने यावेळी आघाडीची ही संधी अजिबात गमावली नाही आणि सातत्याने एकावर एक हल्ले चढवण्याचा रतीबच लावला. क्रॉस कोर्ट ड्रॉप फटक्यावर तिने आपली आघाडी 3 गुणांवर नेली. हीच आघाडी पुढे 5 गुणांवर नेत तिने बिंग जियावला आणखी जेरीस आणले. पुढे आपल्या ट्रेडमार्क स्मॅशवर सिंधूने विजयावर शिक्कामोर्तब केले आणि भारताच्या ऐतिहासिक कांस्यपदकावर भारताची मोहोर उमटली.