दक्षिणपंथी नेत्या मिरियम पेरेट्ज पराभूत
वृत्तसंस्था/ तेल अवीव
इस्रायलचा 11 वा राष्ट्रपती निवडला गेला आहे. इस्रायलच्या संसदेने बुधवारी डाव्या विचारसरणीचे नेते इसाक हर्जोग यांची राष्ट्रपती म्हणून निवड केली आहे. या निर्णयामुळे जातीय आणि धार्मिक समुहांदरम्यान एकतेला प्रोत्साहन मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. हर्जोग यांनी विरोधी उमेदवार मिरियम पेरेट्ज यांना पराभूत केले आहे. मिरियम या शिक्षिका तसेच युद्धात हुतात्मा झालेल्या दोन इस्रायली सैन्याधिकाऱयांच्या आई आहेत.
120 खासदारांनी नवा राष्ट्रपती निवडण्यासाठी मतदान केले आहे. हर्जोग यांना 120 पैकी 87 मते प्राप्त झाली आहेत. तर पेरेट्ज यांना 26 मतेच मिळाली आहेत. हर्जोग पुढील महिन्यात राष्ट्रपतिपद स्वीकारणार आहेत. रेवेन रिवलिन यांची जागा ते घेतील. रिवलिन यांचा 7 वर्षांचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात येणार आहे. 2003 मध्ये पहिल्यांदा खासदार झालेले 60 वर्षीय हर्जोग यांनी लेबर पार्टीचे नेतृत्व करण्यासह आघाडी सरकारांमध्ये मंत्री म्हणून काम पाहिले आहे. इस्रायलसाठी ज्यू संस्थेचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले आहे. ही संस्था इस्रायलमध्ये स्थायिक होऊ इच्छिणाऱया ज्यू धर्मीयांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारसोबत मिळून काम करते. तर 67 वर्षीय पेरेट्ज यांना अधिक रुढिवादी, उजव्या विचारसरणीच्या नेत्या म्हणून ओळखले जाते.
इसाक यांचे वडिल चॅम हर्जोग हे देखील राष्ट्रपती राहिले आहेत. 1983 आणि 1993 दरम्यान ते राष्ट्रपती होते. तर 2013 मध्ये इसाक यांनी पंतप्रधान पदासाठी दावेदारी केली होती. पण त्यांना बेंजामीन नेतान्याहू यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.