ब्राझीलच्या ‘ऍमॅझोनिया-1’सह 19 उपग्रहांचे प्रक्षेपण होणार
श्रीहरिकोटा / वृत्तसंस्था
नववर्ष 2021 मधील इस्त्रोची पहिली मोहीम आज, रविवारी होत आहे. या मोहिमेची उलट गणती (काऊंटडाऊन) शनिवारी सुरू झाली असून श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून रविवारी सकाळी 10 वाजून 24 मिनिटांनी प्रक्षेपकाचे उड्डाण होईल. या मोहिमेद्वारे ब्राझीलच्या ‘ऍमॅझोनिया-1’ या उपग्रहाबरोबरच अन्य 18 छोटे उपग्रहही अंतराळात पाठवले जाणार आहेत. पीएसएलव्ही-सी51 या प्रक्षेपक रॉकेटद्वारे ही मोहीम फत्ते केली जाणार आहे. पीएसएलव्ही प्रक्षेपकाची ही 53 वी मोहीम असणार आहे. या मोहिमेची तयारी पूर्ण झाली आहे.
भगवद्गीता, मोदींचे छायाचित्र होणार रवाना
भारतीय स्टार्टअप स्पेसकिड्स इंडियाने तयार केलेला लघु उपग्रहही पीएसएलव्हीद्वारे प्रक्षेपित करण्यात येणार आहे. हा उपग्रह स्वतःसोबत भगवद्गीता, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र आणि 25 हजार जणांची नावे अंतराळात नेणार आहे. देशाच्या अंतराळ मोहिमेत प्रथमच हा नवा प्रयोग होणार आहे.
उपग्रहाच्या टॉप पॅनेलमध्ये मोदींचे नाव आणि छायाचित्र जोडले आहे. तर इस्रो प्रमुख डॉक्टर के. सिवान तसेच वैज्ञानिक सचिव आर. उमा महेश्वरन यांचे नाव खालील पॅनेलवर लिहिले आहे. यापूर्वीही लोकांनी बायबलसारखा पवित्र धर्मग्रंथ अंतराळात नेला आहे. याचमुळे आम्ही भगवद्गीता पाठविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती स्पेसकिड्स इंडियाच्या संस्थापिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीमथी केसन यांनी दिली आहे.