ऑनलाईन टीम / जेरुसलेम :
इस्राईल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष अजूनही सुरू आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हवाई हल्ले होत असताना जमिनीवरुनही हल्ले करावेत का, असा विचार करत इस्राईलने गाझा सीमेवर अतिरिक्त सैन्य आणि रणगाडे तैनात केले आहेत.
मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या या संघर्षादरम्यान गुरुवारी पॅलेस्टाईन कट्टरवाद्यांनी इस्राईलवर रॉकेट्सचा मारा केला. तर इस्राईलनेही त्याला हवाई हल्ल्याने प्रत्युत्तर दिले. गाझामध्ये आतापर्यंत 100 पेक्षा जास्त लोक मारले गेले असून इस्राईलमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, इस्राईलमध्ये ज्यू आणि अरब गटांमध्येही दंगली सुरू आहेत. त्यामुळे देशांतर्गत यादवी युद्ध पेटण्याची शक्यता असल्याचा इशारा इस्राईलच्या राष्ट्रपतींनी दिला आहे.