ऑनलाईन टीम / तेल अविव :
मास्कमुक्त झालेल्या इस्राईलमध्ये बोमर उत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीत 44 जणांचा मृत्यू झाला असून, 103 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
ईशान्य इस्राईल परिसरातील माऊंट मेरॉन पर्वताखाली वसलेल्या मेरॉन शहरात ज्यू नागरिक बोमर हा उत्सव साजरा करतात. येथे दुसऱ्या शतकातील ज्यू संत रब्बी शिमॉन बार योचाई यांची कबर आहे. ज्यू धर्मीयांमध्ये हे अतिशय महत्त्वाचे धार्मिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते. आज येथे बोमर उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाला नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळी लोक शेकोटी पेटवून त्याभोवती नाचून प्रार्थना करत होते. यावेळी दर्शक स्टेडियममधील काही भाग कोसळला. त्यावेळी नागरिकांनी जीव वाचविण्यासाठी धावपळ केली. त्यात चेंगरुन 38 जणांचा मृत्यू झाला आहे. तर झीव रुग्णालयाने आपल्याकडे यातील सहा मृतदेह असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे चेंगरुन मृत्यू झालेल्या लोकांचा आकडा 44 वर पोहचला आहे. इस्राईल सरकारने अद्याप मृतांची अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही.
मृतांमध्ये लहान मुले आणि वयोवृद्ध व्यक्तींची संख्या जास्त आहे. इस्राईलने जखमी व्यक्तींना तातडीने रुग्णालयात पोहचवण्यासाठी 6 हेलिकॉप्टर तैनात केली आहेत. इस्राईलच्या सैन्य दलाची वैद्यकीय पथके देखील माऊंट मेरॉन इथे रवाना करण्यात आली आहेत.