तेल अवीव / वृत्तसंस्था
इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष आणखी भडकला असून मंगळवारी इस्रायलने हमासच्या दोन पॅलेस्टाईन बंदुकधाऱयांना कंठस्नान घातले आहे. नेब्लुस या शहरात इस्रायली सैनिकांनी पॅलेस्टाईन दशहतवाद्यांना अटक करण्यासाठी अभियान हाती घेतले आहे. या अभियानाअंतर्गत कारवाई सुरु असताना सैनिकांवर गोळीबार करण्यात आला. त्यावेळी प्रत्युत्तरात केलेल्या कारवाईत हे बंदुकधारी ठार झाले.
गेला एक महिनाभर पॅलेस्टाईन दहशतवादी आणि इस्रायली सैनिक यांच्यात अनेकदा चकमकी उडाल्या आहेत. दहशतवाद्यांनी इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतर इस्रायलने सैनिकी कारवाई हाती घेतली आहे. यात आतापर्यंत 80 दहशतवादी ठार झाले आहेत. मंगळवारी इस्रायली सैनिकांनी पॅलेस्टाईनी इस्लामिक जिहाद गटाचा म्होरक्या इब्राहिम अल् नेबुल्सी याला अटक करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मोठी चकमक झाली होती. एक महिन्यात इस्रायलने पॅलेस्टाईन दहशतवाद्यांवर 90 वेळा हल्ले चढविलेले आहेत. दहशतवाद्यांनी त्यापूर्वी गाझा पट्टीत हल्ले करुन 19 इस्रायली नागरीकांना मारले आहे. या हल्ल्यांचा प्रतिशोध म्हणून इस्रायलने सध्या हमास आणि इतर पॅलेस्टाईन दहशतवाद्यांविरोधात युद्धसदृश कारवाईला प्रारंभ केला आहे. गेल्या तीन दिवसांमध्येच 46 पॅलेस्टाईनी दहशतवाद्यांना मारण्यात आले आहे. काही पॅलेस्टाईनी नागरीकही मारले गेले असून त्यांच्यात 16 मुले आणि महिलांचाही समावेश आहे.
वायुहल्ल्यांचीही कारवाई
इस्रायलने केवळ सैनिक कारवाईच नव्हे, तर पॅलेस्टाईनी दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर वायुहल्लेही केले आहेत. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्ष इस्रालयच्या स्थापनेपासूनचा आहे. 1967 मधील युद्धात इस्रायलने गाझा पट्टवर ताबा मिळविलेला होता. तसेच पश्चिम तटही (वेस्ट बँक) आपल्या अधिपत्यात आणला होता. या भागात आता साधारणतः 4 लाख इस्रायली नागरीकांची वस्ती आहे. आतापर्यंतच्या संघर्षात नेहमी इस्रायलची सरशी झाली आहे.