युरोपीय देशांमधील इस्रायली दूतावासांवर हल्ल्याचा होता कट
वृत्तसंस्था/ तेल अवीव
जगभरात प्रसिद्ध असलेली इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादने इस्रायलच्या दूतावासांवर इराणकडून करण्यात आलेले हल्ले हाणून पाडल्याचा दावा केला आहे. इराणकडून कटांतर्गत घातक हल्ल्यांचा प्रयत्न करण्यात आला होता, असे मोसादकडून सांगण्यात आले.
इस्रायल आणि त्याचा कट्टर शत्रू इराण यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. इराणमध्ये इस्रायलसंबंधीचा कडवटपणा तीव्र होत आहे. काही दिवसांपूर्वी इस्रायलने इराणच्या भूमिगत आण्विक केंद्रावर सायबर हल्ला घडवून आणत ते नष्ट केले होते. इराण अणुबॉम्ब तयार करू पाहत असल्याचा इस्रायलचा आरोप आहे. इस्रायलच्या आण्विक केंद्रावरील हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इराणने युरोपमध्ये हल्ले घडवून आणण्याचा कट रचला होता. परंतु मोसादने इराणचा कट उधळला आहे.
इराणच्या आण्विक केंद्राला नष्ट केल्याचा आरोप इस्रायलने पूर्णपणे फेटाळलेला नाही. तर इराणने हल्ला केलेल्या देशांची नावे मोसादने उघड केलेली नाहीत. संबंधित देशांच्या सरकारांनी इराणचे हल्ले रोखण्यास पूर्णपणे मदत केल्याचे मोसादकडून म्हटले आहे. 2012 मध्ये नवी दिल्ली येथील इस्रायलच्या दूतावासावर झालेल्या हल्ल्यामागे इराणचा हात होता, असा आरोप आहे.
भूमिगत नतान्ज आण्विक केंद्र नष्ट करण्याच्या कारवाईला प्रत्युत्तर देणार असल्याची धमकी इराणने दिली आहे. सायबर हल्ल्याला प्रत्युत्तर देणे आमच्या राष्ट्रीय सुरक्षेचा हिस्सा आहे. सायबर हल्ल्याद्वारे आमच्या देशाला लक्ष्य करण्यात आल्याचे सिद्ध झाल्यास धडा शिकवू असे इराणच्या नागरी सुरक्षा विभागाचे प्रमुख घोलमरेजा जलाली यांनी म्हटले आहे. इराणकडून इस्रायलविरोधात हिजबुल्ला संघटनेला मदत पुरविली जात आहे.