धार्मिक कार्यक्रमातील दुर्घटनेत दीडशेहून अधिक जखमी
तेल अवीव / वृत्तसंस्था
इस्रायलच्या माऊंट मेरोन इथे लाग बी’ओमर नावाच्या धार्मिक कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 44 लोकांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यात दीडशेहून अधिक लोक जखमी झाले असून अनेकजण गंभीर आहेत. इस्रालयमधील रूढीवादी ज्यू लोकांच्या मुख्य धार्मिक उत्सवादरम्यान घडलेल्या या घटनेने देशभर हळहळ व्यक्त केली जात आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वषी या उत्सवाचे आयोजन करण्यात आले नव्हते. यावषी लसीकरणानंतर या आयोजनाला परवानगी देण्यात आली होती. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ही घटना मोठी दुर्घटना असल्याचे सांगत सर्व जखमींना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.
धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने येथे मोठय़ा संख्येने ज्यू लोक तीर्थयात्रेत सहभागी होण्यासाठी एकत्र जमले होते. हा कार्यक्रम एका स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला होता. याचदरम्यान आसनांचा एक भाग पडल्यानंतर लोकांमध्ये धावपळ माजली. लोक चहूदिशांना पळू लागल्यानंतर चेंगराचेंगरी झाली. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये लहान मुले आणि वृद्धांचाही समावेश आहे. इस्रालयची बचाव सेवा ‘द मॅगन डेव्हिड एडोम’ने मृतांची संख्या अजून वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर पोलिसांनी हा संपूर्ण भाग बंद केला आहे. पोलिसांसोबत बचाव यंत्रणाही जखमींना लवकरात लवकर रुग्णालयात पोहोचवण्याच्या कामात गुंतलेल्या आहेत. आपत्कालीन सेवांनी जखमींना बाहेर काढण्यासाठी 6 हेलिकॉप्टर तैनात केली आहेत. तसेच लष्कराची मदतही घेतली जात आहे.
………..