60 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना बुस्टर डोस
वृत्तसंस्था / जेरूसलेम
इस्रायलमध्ये 60 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना कोरोना लसीचा तिसरा डोस देण्यात येणार आहे. पुढील आठवडय़ापासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी ही माहिती दिली आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नेफ्टाली बेनेट यांनी आरोग्य अधिकाऱयांसोबत बैठक घेत वृद्धांना तिसऱया डोसच्या प्रस्तावाचे समर्थन केले होते.
आरोग्यविषयक तज्ञांच्या एका शासकीय समितीच्या शिफारसीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. 60 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांमध्ये गंभीर संक्रमण रोखण्यात लसीच्या प्रभावोत्पादकतेत (इफेक्टिव्हनेस) घट झाल्याने हा निर्णय घ्यावा लागला आहे.
तज्ञांच्या समितीने बुधवारी रात्री बैठकीदरम्यान लसीच्या प्रभावोत्पादकतेशी निगडित डाटा सादर केला होता. जानेवारीमध्ये लस मिळालेल्या 60 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांमध्ये गंभीर संक्रमणापासून वाचविण्यात लसीची प्रभावोत्पादकता एप्रिलमध्ये 97 टक्के होती. पण जुलैमध्ये हा आकडा कमी होत 81 टक्क्यांवर आला आहे. म्हणजेच 3 महिन्यात प्रभावोत्पादकतेत 16 टक्क्यांनी घट झाली आहे. पण समितीतील सर्व सदस्यांमध्ये एकमत नव्हते. तरीही 60 वर्षांहून अधिक वय असलेल्या लोकांना बूस्टर डोस देण्यास बहुतांश जण सहमत होते.
मागील काही आठवडय़ांमध्ये गंभीर रुग्णांची संख्या वाढली आहे. बुस्टर डोस 60 वर्षांऐवजी 65 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना देण्यात यावा असेही काही तज्ञांचे मत होते. काही तज्ञांनी तिसऱया डोसशी संबंधित डाटा नसल्याबद्दल चिंताही व्यक्त केली आहे.
गंभीर रुग्णांची संख्या वाढतेय इस्रायलमध्ये नव्या गंभीर रुग्णांची संख्या मागील दोन दिवसांपासून सातत्याने वाढत आहे. सोमवारी हा आकडा 20 होता, जो मंगळवारी वाढून 33 तर बुधवारी 41 वर पोहोचला आहे. ऑगस्टपर्यंत गंभीर रुग्णांचा आकडा 1 हजारापर्यंत पोहोचण्याचा अनुमान आरोग्य सेवेशी संबंधित अधिकाऱयांनी व्यक्त केला आहे.