निर्णयाचे झाले स्वागत
वृत्तसंस्था / ढाका
इस्रायलसाठी कित्येक दशकांपासून सुरू असलेली प्रवासबंदी हटविण्याची घोषणा बांगलादेशने केली आहे. या निर्णयाचे इस्रायलने स्वागत केले आहे. दोन्ही देशांच्या लोकांच्या लाभासाठी तेल अवीवसोबत राजनयिक संबंध प्रस्थापित करावेत, असे आवाहनही केले आहे. यापूर्वी बांगलादेशच्या पासपोर्टवर इस्रायल वगळून जगातील सर्व देशांसाठी मान्य असल्याचे नमूद असायचे. बांगलादेश सरकारने दस्तऐवजामधून ‘इस्रायल वगळून’ हा उल्लेख हटविण्याचा निर्णय घेत पासपोर्टला पूर्ण जगासाठी वैध ठरविले आहे.
बांगलादेशने उचललेले हे पाऊल स्वागतार्ह आहे. बांगलादेश सरकारला इस्रायलसोबत राजनयिक संबंध प्रस्थापित करण्याचे आवाहन करत असल्याचे उद्गार इस्रायलच्या विदेश मंत्रालयातील उपमहासंचालकांनी काढले आहेत.
पासपोर्टने आंतरराष्ट्रीय मापदंडांची पूर्तता करावी याकरता बदल करत आहोत, असे बांगलादेशचे गृहमंत्री असदुज्जमां खान कमाल यांनी म्हटले आहे. 8 दशकांच्या इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षात बांगलादेशने नेहमीच पॅलेस्टिनींना समर्थन दिले आहे. बांगलादेशने अद्याप इस्रायलला मान्यता दिली नसल्याने दोन्ही देशांदरम्यान राजनयिक संबंध नाहीत. इस्रायलने मागील वर्षी इस्लामिक देश संयुक्त अरब अमिरात, बहारीन, मोरक्को आणि सूदानसोबत स्वतःचे संबंध प्रस्थापित केले होते.