युवराज सलमान यांच्या निर्णयामुळे पाकिस्तान पेचात
वृत्तसंस्था / रियाध
इस्रायलसोबत संबंध प्रस्थापित करण्यास सौदी अरेबियाने होकार दर्शविला आहे. संयुक्त राष्ट्रसंघातील सौदी अरेबियाचे स्थायी प्रतिनिधी अब्दुल्लाह अल-मोल्लिमी यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. इस्रायलने 2002 ची अरब शांतता योजना लागू केल्यास केवळ सौदी अरेबियाच नव्हे तर ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनचे (ओआयसी) सर्व 57 सदस्य देश संबंध प्रस्थापित करणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
ओआयसीमध्ये आखातातील सर्व इस्लामिक देशांसह पाकिस्तानही सामील आहे. पाकिस्तानने अद्याप इस्रायलला मान्यता दिलेली नाही. दोन्ही देशांदरम्यान राजनयिक संबंध नसल्याने कुठलाच इस्रायली नागरिक पाकिस्तानात जाऊ शकत नाही आणि पाकिस्तानी नागरिक ज्यू देशात पाऊल ठेऊ शकत नाही. सौदी अरेबियाने संबंध प्रस्थापित केल्यास पाकिस्तानसमोर मोठा पेच निर्माण होणार आहे.
एकाकी पडणार पाकिस्तान
सौदी अरेबियाने इस्रायलला मान्यता दिल्यास पाकिस्तानवरील दबाव वाढेल. पाकिस्तानचा मित्रदेश तुर्कस्तानने पूर्वीच इस्रायलसोबत घनिष्ठ संबंध प्रस्थापित केले आहेत. पाकिस्तानची अर्थव्यवस्था यापूर्वीच गर्तेत सापडली आहे. पंतप्रधान इम्रान खान हे निधीसाठी युएई आणि सौदी अरेबियावर अवलंबून आहेत. अशा स्थितीत या दोन्ही देशांपैकी एकानेही इस्रायलसोबत संबंध प्रस्थापित करण्यास दबाव टाकल्यास इम्रान खान यांच्यासमोर संकट उभे राहू शकते.
इराण ठरला निमित्त
सौदी अरेबिया आणि इराण यांच्यात सुरू असलेली चर्चा आतापर्यंत निष्फळ ठरली आहे. इराण चर्चेकरता गंभीर नसल्याचे अब्दुल्लाह अल-मोल्लिमी यांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत आखाती देशांमध्ये इराणचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी इस्रायलसोबत मैत्री राखणे सौदी अरेबियाला भाग पडले आहे. येमेनमध्ये सक्रीय इराणपुरस्कृत हुती बंडखोरांच्या हल्ल्यांमुळे सौदी अरेबियाला मोठे नुकसान झेलावे लागत आहे.
2002 ची अरब शांतता योजना
मार्च 2000 मध्ये अरब लीगच्या लेबनॉनची राजधानी बैरूत येथे झालेल्या बैठकीत पॅलेस्टाईनवरून एका शांतता योजनेवर सहमती झाली होती. या योजेनला अरब शांतता योजना नाव दिले जाते. याच्या अंर्तत इस्रायलला वेस्ट बँक, गाझापट्टी, गोलन हाइट्स आणि लेबनॉनच्या स्वतःच्या कब्जातील क्षेत्रांमधून माघार घ्यावी लागणार आहे. परंतु इस्रायलने अनेकदा या योजनेला नाकारले आहे.
संबंध होत आहेत मजबूत इस्रायल आणि सौदी अरेबियात यांच्यात मागील काही वर्षांमध्ये पडद्याआडून संबंध मजबूत होत आहेत. सौदी अरेबिया आणि इस्रायल दोघेही इराणच्या अण्वस्त्रनिर्मिती कार्यक्रमाला विरोध करतात. याचबरोबर हे दोन्ही देश येमेन, सीरिया, इराक आणि लेबनॉनमध्ये इराणच्या महत्त्वाकांक्षेवरून चिंतेत आहेत. हिजबुल्लाहवरून इस्रायल आणि सौदी अरेबियाची भूमिका सारखीच आहे. सौदी अरेबिया आणि इस्रायल गुप्तचर माहिती, तंत्रज्ञान आणि सायबुर सुरक्षेच्या क्षेत्रात मिळून काम करत असल्याचे मानले जाते. तर इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादचे प्रमुख हे सौदी गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख तसेच अन्य सौदी नेत्यांना गुप्त स्वरुपात भेटत राहिले आहेत.