अधिक दराने लस खरेदी
कोरोना लसीकरणाच्या शर्यतीत इस्रायल सध्या सर्वात आघाडीवर आहे. इस्रायलने 20 दिवसांत स्वतःच्या लोकसंख्येच्या पाचव्या हिस्स्याला लस दिली आहे. तेथे जवळपास 18 लाख लोकांना लस देण्यात आली आहे. लसीचे अधिक डोस तसेच लवकर पुरवठय़ासाठी इस्रायलने ब्रिटनच्या तुलनेत 50 टक्के अधिक किंमत मोजली आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी लसउत्पादक फायजर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोर्ला यांना काही दिवसांच्या आतच 17 वेळा फोन करून डोस लवकर मिळविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. इस्रायलच्या विरोधी पक्षाच्या नेत्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे.
नेतान्याहू यांनी स्वतःची घटती लोकप्रियता तसेच राजकीय स्थिती मजबूत करण्यासाठी लसीकरता अधिक किंमत मोजली असल्याचे या नेत्याने म्हटले आहे.
फायजरच्या लसीसाठी ब्रिटनने 30 युरो (सुमारे 2700 रुपये) प्रतिडोसच्या हिशेबाने दिले आहेत. तर इस्रायलने 45 युरो (सुमारे 4000 रुपये) दिले आहेत. म्हणजेच लस लवकर प्राप्त करण्यासाठी इस्रायलने 50 टक्के अधिक किंमत मोजली आहे. लसीची किंमत ही प्रमाण आणि पूर्वी झालेल्या व्यवहारावर आधारित असल्याचे फायजरच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
नेतान्याहू यांनी घेतला दुसरा डोस
इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी रविवारी आरोग्यमंत्री यूली एडेलस्टीन यांच्यासोबत फायजरच्या लसीचा दुसरा डोस घेतला आहे. इस्रायलच्या सर्व नागरिकांना 2-3 महिन्यांमध्ये लस देण्यात येणार आहे. त्यानंतर आम्ही अर्थव्यवस्था खुली करू शकू असे नेतान्याहू यांनी नमूद केले आहे. फायजरला अधिक डोस देण्यास सांगितले असून त्याच्याद्वारे मार्चपर्यंत सर्व नागरिकांचे लसीकरण करता येणार असल्याचे नेतान्याहू म्हणाले.