चीन-पाकिस्तानला मोठा झटका
वृत्तसंस्था/ थिम्पू
भारताचा मित्र असलेल्या इस्रायलने आता भूतानसोबत स्वतःचे राजनयिक संबंध प्रस्थापित केले आहेत. इस्रायलचे विदेशमंत्री गाबी अश्केनजी यांनी याची घोषणा करत इस्रायलच्या मान्यतेची कक्षा व्यापक होत असल्याचे विधान केले आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भूतानच्या पंतप्रधानांना फोन करून संबंध जोडण्याचा प्रयत्न केला होता. तर डोकलामनंतर चीनही भूतानच्या भूमीवर दोन गावे वसवून तणाव वाढवत आहे.
किंगडम ऑफ भूतानसोबत संबंधांची स्थापना आशियात इस्रायलच्या संबंधांना दृढ करण्याच्या दृष्टीने एक नवा टप्पा ठरणार असल्याचे गाबी यांनी म्हटले आहे. तर भारतातील इस्रायलचे राजदूत रॉन माल्का यांनी भूतानसोबतच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
या करारामुळे दोन्ही देशांच्या लोकांच्या लाभासाठी सहकार्याच्या अनेक संधी उपलब्ध करणार आहे. हा करार इस्रायलसाठी ऐतिहासिक ठरल्याचे म्हणत माल्का यांनी दोन्ही देशांचे अधिकारी दस्तऐवजावर स्वाक्षरी करतानाची छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित केली आहेत.
भारताची कोंडी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चीन आणि पाकिस्तानने भूतानला स्वतःसोबत घेण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत, या प्रयत्नांना यश न मिळाल्यानेच चीनने 2017 मध्ये डोकलामचा वाद उकरून काढला होता. डोकलाम वादामुळे घाबरून भूतान स्वतःच्या कळपात शिरणार असल्याची स्वप्ने चीन पाहत होता. परंतु भूतानने चीनला धुडकावून लावले होते. याचमुळे चीनने भूतानच्या भूमीवर घुसखोरी केली आहे.
इम्रान यांचा डाव
नेपाळला भारताच्या विरोधात उभा केल्यावर चीन आणि पाकिस्तानने भूतानला अनेक आमिषे दाखविली होती. ऑक्टोबर महिन्यात इम्रान खान यांनी भूतानचे पंतप्रधान लोटे त्शेरिंग यांना फोन केला होता. भूतानच्या नेत्याशी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी पहिल्यांदाच संपर्क साधला होता. चीनसोबतच्या भारताच्या तणावादरम्यान पाकिस्तानच्या या कृत्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.