वृत्तसंस्था/रियाध :
इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरात (युएई) यांच्यातील नव्या मैत्रीवर सौदी अरेबियानेही शिक्कामोर्तब केले आहे. इस्रायल आणि युएई यांच्यातील विमानसेवेकरता स्वतःचे हवाईक्षेत्र वापरण्याची मंजुरी सौदी अरेबियाने दिली आहे. सौदीच्या निर्णयाचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यंनी स्वागत केले आहे. सर्व 22 अरब देशांशी इस्रायलची मैत्री शक्य असल्याचे उद्गार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई आणि विशेष सल्लागार जेरेड कुशनर यांनी काढले आहेत.
इस्रायल आणि युएई यांच्यात अलिकडेच शांतता करार झाला आहे. सौदी अरेबिया शासनाने या कराराला विरोध केला नव्हता तसेच समर्थनही दिले नव्हते. परंतु इस्रायल-युएई विमानसेवला स्वतःची हवाईहद्द वापरू देणे कूटनीतिकदृष्टय़ा अत्यंत मोठे पाऊल आहे. इस्रायलचे नागरिक आता भारतात कमी खर्चात आणि कमी वेळेत पोहोचू शकणार आहेत. हीच स्थिती मलेशियाबाबतही होणार आहे. युएई इस्रायलच्या नागरिकांसाठी आता प्रवासाचे मुख्य केंद्र ठरणार आहे. जेरेड कुशनर यांनी इस्रायल-युएई शांतता करारात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आगामी काळात अरब देश आणि इस्रायल यांच्यात अत्यंत सुरळीत संबंध पाहण्याची शक्यता असल्याचे कुशनर यांनी युएईमधून परतताना म्हटले आहे.