टाळेबंदीमुळे अंतराळ मोहीम रखडणार
कोरोना विषाणूचा फटका आता इस्रोलाही बसला आहे. टाळेबंदीमुळे इस्रोच्या सर्व केंद्रांमधील काम घटले आहे. कोरोना संकटामुळे इस्रोचे बजेटही कमी झाले आहे. इस्रोसाठी 2020-21 च्या पहिल्या तिमाहीच्या बजेटमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. या कपातीमुळे इस्रोच्या कार्यप्रणालीवर किती प्रभाव पडणार हे सांगणे सद्यस्थितीत अवघड आहे. परंतु टाळेबंदी आणि निधीच्या चणचणीमुळे इस्रोचे अनेक प्रकल्प लांबणीवर पडू शकतात.
मर्यादित खर्च करा
इकॉनॉमिक अफेयर्स विभागाच्या अर्थसंकल्प शाखेने अंतराळ विभागाला 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत 15 टक्क्यांची कपात केली जात असल्याचे कळविले आहे. इस्रोचे बहुतांश वैज्ञानिक टाळेबंदीदरम्यान घरांमधूनच काम करत आहेत. सर्व मोहिमा रोखण्यात आल्या आहेत. काही मोहिमांचे काम पूर्ण झाले होते, परंतु सर्व प्रकल्प आणि मोहिमा जैसे थे स्थितीत ठेवण्यास सांगण्यात आले आहे. सुमारे 17 हजार वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ स्वतःच्या घरांमधून काम करत आहेत.
मोहिमेवर पडणार नाही प्रभाव
इस्रोकडे प्रत्येक मोहिमेसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद असते. सर्वसाधारणपणे कुठलीच मोहीम थांबवावी लागू नये इतका निधी इस्रोकडे कायम असतो. पहिल्या तिमाहीच्या बजेटमध्ये करण्यात आलेल्या 15 टक्के कपातीचा मोहिमेवर प्रभाव पडणार नसल्याचे इस्रोच्या माजी वैज्ञानिकाने म्हटले आहे.
भविष्यातील मोहीम
चालू आर्थिक वर्षात इस्रोच्या सुमारे 10 मोहिमा प्रस्तावित होत्या. या सर्व मोहिमांना आता विलंब होणार आहे. आदित्य-एल1, चांद्रयान-3 आणि गगनयान यांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. याचबरोबर जीसॅट-2, रिसोर्ससॅट-3 आणि 3एस, ओशनसॅट-3, स्पेडएक्स, आयआरएनएसएस मोहीम राबविण्याची योजना आहे.