‘ईओएस-01’ निरीक्षण उपग्रहासह 9 विदेशी उपग्रहांचा समावेश
श्रीहरिकोटा / वृत्तसंस्था
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) शनिवारी एकाचवेळी 10 उपग्रहांचे प्रक्षेपण केले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून हे प्रक्षेपण करण्यात आले. पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकलच्या (पीएसएलव्ही-सी49) माध्यमातून शनिवारी दुपारी 3 वाजून 12 मिनिटांनी सर्व उपग्रह अवकाशात झेपावले. उपग्रह प्रक्षेपणासाठी 3 वाजून 2 मिनिटे ही वेळ निश्चित करण्यात आली होती. परंतु, वातावरणातील खराबीमुळे प्रक्षेपण 10 मिनिटांनी लांबणीवर टाकण्यात आले होते. ‘पीएसएलव्ही-सी49’ची ही एकावन्नावी मोहीम ठरली.
इस्रोने पाठविलेल्या उपग्रहांमध्ये ईओएस-01 या प्रायमरी सॅटेलाईटसह अन्य 9 विदेशी उपग्रहांचा समावेश आहे. ईओएस-01 हा पृथ्वीचे निरीक्षण करणारा उपग्रह आहे. याचा वापर शेती, वने यांच्यावर नजर ठेवण्यासह आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी करण्यात येणार आहे. अन्य विदेशी उपग्रहांना व्यावसायिक करारांतर्गत प्रक्षेपित करण्यात आले आहे. हा करार न्यूस्पेस इंडिया लिमिटेड आणि डिपार्टमेंट ऑफ स्पेससोबत करण्यात आला आहे.
या उपग्रहांच्या प्रक्षेपणाचे थेट प्रक्षेपण सोशल मीडियावरून करण्यात आले होते. इस्रोच्या वेबसाईटसह यूटय़ूब, फेसबुक आणि ट्विटरवर प्रसारित हे प्रक्षेपण अनेक लोकांनी ‘लाईव्ह’ पाहिले. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातील गॅलरीमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींना अनुमती देण्यात आली नव्हती.