प्रतिनिधी/ इस्लामपूर
इस्लामपूर शहरात झालेल्या अत्याधुनिक सिसिटीव्ही कॅमेऱ्यांमुळे शहरात सुरक्षिततेची व्यवस्था निर्माण झाली आहे. भविष्यात सातशे ते आठशे कॅमेरे बसवण्याचे उद्दिष्ट ठेवू.नागरीकांनी व्यक्तीगत आपल्या घरासमोर व दुकानांसमोर अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यासाठी पुढाकार घ्यावा. इस्लामपूर पोलीसांच्या निवासस्थानांचा प्रश्न मार्गी लागला असून लवकरच येथे ८६ निवासस्थानांची आठ मजली इमारत उभी करू, अशी ग्वाही जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.
शहरात १० महत्वाची ठिकाणी जिल्हा नियोजन समितीच्या २५ लाख रुपयांच्या निधीतून ३० कॅमेरे बसवण्यात आले आहेत. इस्लामपूर पोलीस ठाण्यात याचा लोकार्पण सोहळा झाला. शुभारंभ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा.शामराव पाटील, रणजित मंत्री, पोलीस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यासह अन्य उपस्थित होते.
पाटील पुढे म्हणाले, वर्षभरापूर्वी या कॅमेऱ्याबाबात तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांना प्रस्ताव पाठवण्यास सांगून पाठपुरावा केला. कोरोना काळात निधी देणे अवघड होते. पण इस्लामपूर व विटा शहरासाठी निधी मिळवून ही अत्याधुनिक व्यवस्था करण्यात आली. शहर सुरक्षितेबरोबर गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी ही सुविधा उपयुक्त आहे. भविष्यात आमदार फंडातून निधी देवून शहरातील शाळा, महाविद्यालय परिसरात कॅमेरे बसवावेत. सातशे ते आठशे कॅमेरे बसल्यास मोठा फायदा होईल. पोलीस परेड ग्राऊंड देखील लोकांना व्यायामासाठी सुसज्ज केले आहे. या ठिकाणी जायंटसच्या पुढाकाराने ओपन जीम झाली आहे.