शिवसेनेचा पालिकेवर धडक मोर्चा : नगराध्यक्ष पाटील यांना निवेदन : स्व.बाळासाहेबांनी इस्लामपूरचे ईश्वरपूर नामकरण केले होते
प्रतिनिधी / इस्लामपूर
इस्लामपूर शहराचे नाव बदलून ईश्वरपूर असे नामकरण करावे, या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने इस्लामपूर नगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
प्रारंभी शिवसेना कार्यालयापासून भगवे फेटे परिधान करुन शेकडो शिवसैनिक मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन हा मोर्चा नगरपालिकेवर धडकला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख पवार म्हणाले, हिंदूहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शहरामधील यल्लामा चौकातील १९८३ साली झालेल्या जाहीर सभेत इस्लामपूरचे ‘ईश्वरपूर’ असे नामकरण केलेले आहे. इस्लामपूर शहरवाशीयांची व्यापारी बांधवांची आग्रहाची मागणी आहे.
निवेदन दिल्यानंतर नगराध्यक्ष पाटील म्हणाले, शिवसेनेकडून इस्लामपूरचे नामकरणाचे निवेदन मिळाले असून दि.१६ डिसेंबर रोजी होणाऱ्या सभेपुढे हा विषय ठेवण्यात येईल. व यावर सकारात्क निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी नगरसेवक शकील सय्यद, प्रदीप लोहार, प्रतिभा शिंदे, सीमा पवार, शिवसेना तालुकाप्रमुख सागर मलगुंडे, घनशाम जाधव, अंकुश माने, संजय गायकवाड, राजेंद्र पवार यांच्यासह अन्य शिवसैनिक उपस्थित होते