ऑनलाईन टीम / ओटावा :
कॅनडात इस्लामविरोधी द्वेषापोटी एका मुस्लिम कुटुंबाची अंगावर पिकअप ट्रक घालून हत्या करण्यात आली. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक लहान मुलगा बचावला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी 20 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. हा आरोपी लंडनचा स्थानिक असून, त्याच्याविरोधात फर्स्ट डिग्री हत्या आणि एक हत्येचा प्रयत्न असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
इस्लामविरोधी द्वेषातून आरोपीने रविवारी पिकअप ट्रकने मुस्लिम कुटुंबाला जोरदार धडक दिली आणि पळ काढला. हा द्वेषाने प्रेरित आणि पूर्वनियोजित कट असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. या घटनेत 74 आणि 44 वर्षीय महिला, 46 वर्षीय पुरुष आणि 15 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. तर 9 वर्षांचा मुलगा बचावला आहे. या कुटुंबाच्या विनंतीनुसार मृतांची नावे पोलिसांकडून जाहीर करण्यात आली नाहीत.