संबंधित महिलेच्या आईचे पंतप्रधान मोदींना आवाहन
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
इस्लामिक स्टेट दहशतवाद्याची पत्नी केरळची रहिवासी आणि तिचा मुलगा अफगाणिस्तानातील तुरुंगात कैद आहेत. एका हल्ल्यात दहशतवादी पती मारला गेल्यावर निमिषा उर्फ फातिमाने आत्मसमर्पण केले होते. तेव्हापासून मुलासोबत तिला काबूलच्या तुरुंगात ठेवण्यात आले आहे. तर केरळमध्ये राहत असलेल्या निमिषाच्या आईने स्वतःच्या मुलीला परत आणण्याचे आवाहन मोदी सरकारला पेले आहे. केंद्र सरकार इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांना भारतात आणण्यास इच्छुक नाही.
माझ्या मुलीचे ब्रेनवॉश करण्यात आल्याचे मी मानते. ती इस्लामिक विचारसरणीवर विश्वास ठेवायची. अफगाणिस्तानात ज्या व्यक्तीने तिला नेले होते, तो मारला गेला आहे. मी माझ्या मुलीला जिवंत पाहू इच्छिते. माझ्या मुलीला जिवंत पाहण्याची संधी मिळावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्वोच्च न्यायालयाला करत असल्याचे निमिषाच्या आई बिंदू संपत यांनी एक चित्रफितीद्वारे म्हटले आहे.
मोदी सरकार माझ्या मुलीला माफ करून भारतात परत आणेल अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत दयाळू असल्याचे मी ऐकले आहे. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचे बिंदू संपत यांनी म्हटले आहे.
केरळमधील 4 महिला सध्या काबूलच्या तुरुंगात कैद आहेत. या मुद्दय़ावर सरकारकडून कुठलीच माहिती देण्यात आलेली नाही. पंतप्रधान मोदींना भेटून यासंबंधी निवेदन सोपविण्याची इच्छा आहे, पण याप्रकरणी कुणीच मदत करत नाही. माझ्या मुलीला परत आणण्याचे सर्व मार्ग अयशस्वी ठरल्यास कायदेशीर मार्गाची मदत घेणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या काही वकीलांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे.
निमिषा संपतने इस्लाम धर्म स्वीकारत स्वतःचे नाव फातिमा ठेवले होते. तिने इस्लामिक स्टेटच्या केरळमधील दहशतवाद्यासोबत विवाह केला होता. 19 जणांसह हे दांपत्य जून 2016 मध्ये फरार होत अफगाणिस्तानच्या इस्लामिक स्टेटच्या नियंत्रणाखालील भागात पोहोचले होते. फातिमाने तेथे मुलाला जन्म दिला आहे.