क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
मानस स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित कॅम्पमधील युनियन जिमखाना येथील टर्फ मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या 12 वर्षाखालील आंतरशालेय एमएसडीएफ फुटबॉल चषक स्पर्धा इस्लामिया संघाने सेंट झेवियर्सचा सडन डेथमध्ये 3-1 असा पराभव करून एमएसडीएफ चषक पटकाविला.
युनियन जिमखाना टर्फ मैदानावर खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात इस्लामिया प्राथमिक शालेय संघाने सेंट झेवियर्स प्राथमिक शालेय संघावर सडनडेथवर 3-1 असा विजय संपादन केला.
या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू पुरस्कार झेन मुल्ला, सर्वोत्कृष्ट गोलरक्षक उजेर रोटीवाले, सर्वोत्कृष्ट बचावपटू पुरस्कार स्वप्नील, स्पर्धेतील उदयोन्मुख फुटबॉलपटू अंकित चौधरी, इम्पॅक्ट फुटबॉलपटू हसनेन लालबाग यांना तर विशेष पुरस्कार समर्थ भंडारी, अब्बास शासाब, रिहान पटवेकर यांना रोख आणि आकर्षक चषक देवून गौरविण्यात आले.
बक्षिस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून सीपीआय श्रीदेवी पाटील, माजी नगरसेविका रेणू किल्लेकर, भाग्यश्री देसाई, रिटा नाईक, किशोर नाईक, अफरोज मुल्ला, तहसीन मुल्ला, तेजस्विनी नाकाडी, सलीम फनिबंद, फुटबॉल प्रशिक्षक मानस नायक, यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या फुटबॉल संघांना चषक व प्रशस्तीपत्र व रोख बक्षीस देवून गौरविण्यात आले. पंच म्हणून समर्थ बांदेकर, मारुती माथूर, राहिद मुखुटखान यांनी काम पाहिले.