असंघटीत क्षेत्रातील कामगारांची नोंदणी – 26 ऑगस्ट 2021 पोर्टलची स्थापना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात विविध स्तरावर कर्मचारी वर्ग वेगवेगळय़ा क्षेत्रात कार्यरत आहे. यात असेही काही कामगार आहेत जे असंघटीत क्षेत्रात आहेत. अशा कामगारांची एकत्रित नोंदणी करण्यासाठी इ-श्रम पोर्टल सुरू करण्यात आले आहे. याअंतर्गत इ-श्रम पोर्टलवर नोंदणीकृत कामगारांची संख्या 8 कोटीवर पोहचली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यापैकी 92 टक्के जणांचे उत्पन्न हे 10 हजार रुपये प्रति महिना इतके असल्याची बाब अधोरेखीत झाली आहे.
38 कोटी कामगारांसाठी कल्याणकारी योजना
या पोर्टलवर सअंघटीत क्षेत्रातील कामगारांची नोंदणी केली जाते. राष्ट्रीय स्तरावर कामगारांची माहिती एकत्रित गोळा करण्यासाठी हे पोर्टल तयार करण्यात आलंय. या पोर्टलवरील माहितीनुसार असंघटीत क्षेत्रातील 38 कोटी कामगारांसाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणे हा हेतू येणाऱया काळात साध्य केला जाणार आहे. त्यादृष्टीने सरकार योजना आखत आहे. लवकरच त्याला मूर्त रुप दिलं जाण्याची शक्यता आहे.
कधी सुरूवात
26 ऑगस्ट 2021 ला इ-श्रम पोर्टलची सुरूवात करण्यात आली ज्यात 51 टक्के नोंदणीकृत कामगार महिला आहेत तर 48 टक्के पुरूष आहेत. नव्या माहितीनुसार 8 कोटी असंघटीत क्षेत्रातील कामगारांनी पोर्टलवर नोंदणी केली आहे. यातील 92 टक्के जणांचे मासिक उत्पन्न 10 हजारपेक्षाही कमी असल्याचे दिसले आहे.