मार्केट पोलीस स्थानकामध्ये बैठक
प्रतिनिधी / बेळगाव
ईद-ए-मिलाद हा सण शुक्रवार दि. 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे. कोविडमुळे हा सण साध्यापध्दतीने साजरा करावा, असे आवाहन बेळगाव खडेबाजारचे एसीपी ए. चंदाप्पा यांनी केले. मार्केट पोलीस स्थानकामध्ये मुस्लीम बांधवांची बैठक घेवून त्यांना वरील आवाहन करण्यात आले आहे.
कोविडमुळे राज्य व केंद्र सरकारने मार्गसुची जारी केली आहे. सर्व सण साध्यापध्दतीनेच साजरे करायचे आहेत. ईद-ए-मिलाद देखील मशिदी आणि दर्ग्यामध्ये साजरा करावा. कोणत्याही प्रकारच्या मिरवणुकीला परवानगी दिली जाणार नाही, असेही यावेळी सांगण्यात आले.
यावेळी आम्हाला मिरवणूक काढण्यास परवानगी द्यावी, याचबरोबर फोर्टरोडवर आमच्या धर्माचा झेंडा फडकविण्यास मुभा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. मात्र सरकारकडून आलेल्या मार्गसुचीमुळे तुम्हाला परवानगी देता येणार नाही. सर्वच जाती, धर्मांना हे नियम लागु आहेत. तेंव्हा अत्यंत साध्यापध्दतीने सण साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले.
तुमच्या मागण्यांबाबत पोलीस आयुक्तांना माहिती देण्यात येईल, असे आश्वासनही देण्यात आले. यावेळी मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार, जावेद मुशापुरी, बी. आर. गड्डेकर, धिरज शिंदे, संगमेश शिवयोगी यांच्यासह मुस्लीम बांधवांनी या बैठकीमध्ये भाग घेतला होता.