वृत्तसंस्था/ लंडन
कोव्हिड-19 महामारी संकटामुळे ब्रिटनमधील सर्व क्रीडास्पर्धा लांबणीवर किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. क्रिकेट, टेनिस, फुटबॉल स्पर्धा सध्या पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. ब्रिटनमधील इंग्लिश प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेला पुन्हा सुरूवात करण्याचा प्रयत्न असला तरी किमान सहा फुटबॉल संघांनी आपला विरोध दर्शविला आहे.
इंग्लिश प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धा त्रयस्त ठिकाणी भरविण्याची योजना स्पर्धा आयोजकांनी आखली असल्याचे वेटफोर्ड क्लबच्या प्रमुख कार्यकारिणी सांगितले आहे. 2020 सालातील ब्रिटनमधील फुटबॉल हंगाम पुन्हा जूनमध्ये सुरू करण्याचे प्रयत्न चालू आहेत.
ब्रिटीश शासनाकडून रितसर परवानगी मिळाल्यानंतरच या स्पर्धेतील बाकी असलेले 92 सामने बंदीस्त स्टेडियममध्ये त्रयस्त ठिकाणी खेळविण्याचा आराखडा निश्चित केला जाईल, असे वेटफोर्ड क्लबचे सीईओ स्पॉट डक्सबेरी यांनी सांगितले. या योजनाला सदर स्पर्धेत सहभागी होणाऱया क्लबपैकी किमान सहा क्लबनी आपला विरोध दर्शविला आहे. मात्र 20 पैकी 14 क्लबनी या नव्या प्रस्तावाला आपला होकार कळविला आहे. कोरोना महामारीच्या परिस्थितीचा आढावा घेऊनच ब्रिटन शासनातर्फे या स्पर्धेच्या फेरप्रारंभाला परवानगी दिली जाईल. जर्मनीत कोरोनाची परिस्थिती बिकट असली तरी बुंदेस्लीग फुटबॉल स्पर्धा 16 मे पासून सुरू करण्यात येणार असल्याचे समजते.