5 राज्यांसाठी प्रचाराला वेग
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
5 राज्यांमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसही आक्रमक दिसून येत आहे. राहुल गांधी तसेच प्रियंका वड्रा सातत्याने प्रचारासाठी दौरे करत आहेत. प्रियंका सोमवारी दोन दिवसीय दौऱयानिमित्त आसाममध्ये पोहोचल्या आहेत. प्रचारास प्रारंभ करण्यापूर्वी प्रियंका यांनी गुवाहाटीमध्ये कामाख्या मंदिरात जात दर्शन घेतले आहे.
ईशान्येतील राज्यात प्रियंका वड्रा तर दक्षिणेतील राज्यांमध्ये राहुल गांधी यांनी प्रचाराची धुरा हाती घेतली आहे. राहुल यांनी सोमवारी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथे रोड शो केला आहे. यादरम्यान त्यांनी भाजप तसेच केंद्र सरकावर जोरदार टीका केली आहे.
दिल्लीतील सरकार तमिळ संस्कृतीचा आदर करणे जाणत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात तमिळ लोकांबद्दल सन्मान नाही. मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आम्ही तमिळ संस्कृतीचा अपमान करू देणार नाही. एक देश, एक संस्कृती, एक इतिहास असे मोदी म्हणतात, मग तमिळ ही भारतीय भाषा नाही का? तमिळांचा इतिहास आणि संस्कृती भारताची नाही का? एक भारतीय नागरिक म्हणून तमिळ संस्कृती वाचविणे हे माझे कर्तव्य असल्याचे उद्गार राहुल यांनी काढले आहेत. राहुल यांनी यावेळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानिसामी यांच्यावरही शरसंधान केले आहे. पलानिसामी हे राज्याचे प्रतिनिधित्व करत नाहीत, ते मोदींच्या निर्देशांचे प्रतिनिधित्व करतात. मोदींच्या म्हणण्यानुसार वागणारा व्यक्ती तामिळनाडूचे प्रतिनिधित्व करू शकत नसल्याचा दावा राहुल यांनी केला आहे.