2024 पर्यंत भारतात 8 लाख कोटींची उलाढाल शक्य : मोबाईल शॉपिंगमध्ये वाढ होणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मागील काही दिवसांपासून होत असणाऱया ऑनलाईन बाजारामधील बदलत्या संकेतामुळे येत्या 2024 पर्यंत ई-कॉमर्स मार्केटमधील उलाढालीत जवळपास 84 टक्क्यांची वाढ होणार असल्याची माहिती ग्लोबल फायनान्शिअल टेक्नॉलॉजी कंपनी एफआयएसच्या अहवालामधून देण्यात आली आहे.
सदरच्या मजबूत वाढीसोबत मार्केट जवळपास 8 लाख कोटी रुपयांच्या उलाढालीचे राहणार असल्याचे सांगण्यात येते. प्राप्त अहवालानुसार सदरच्या वाढीसाठी मोबाईल शॉपिंगसह अन्य क्षेत्रांतील व्यवहारांच्या वाढीचा हातभार लागणार असल्याचे सांगण्यात येते. येत्या 4 वर्षांमध्ये ही बाजारपेठ 21 टक्क्यांनी वाढत जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोरोना महामारीच्या दरम्यान डिजिटल कॉमर्समध्ये मजबूत तेजी येणार असून भारतासहीत काही देशांमध्ये अलीकडच्या काळात कोविड प्रभावामुळे ग्राहकांचे व्यवहार मोठय़ा प्रमाणात बदलत गेल्याचे दिसून आले आहे. संपर्काविना ऑनलाइन वस्तु व इतर गोष्टी मागवण्याकडे कल सर्वत्र वाढताना दिसतो आहे. सामाजिक अंतर, मास्क या साऱया गोष्टींपासून दूर राहण्यासाठीच अनेकजण घरातूनच वस्तुंच्या खरेदीची ऑर्डर देत असल्याचे दिसून आले आहे. येणाऱया काळातही खरेदी विक्रीसाठी ग्राहक ऑनलाईन शॉपिंगलाच अधिक प्राधान्य देतील, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
भविष्यात तेजी मजबुतीमध्ये
एफआयएसचे वर्ल्डपे, आशिया पॅसिफिकचे व्यवस्थापकीय संचालक फिल पोमफोर्ड यांच्या माहितीनुसार भारतीय ई-कॉमर्स इंडस्ट्रीजने कोविडच्या काळात मोठी तेजी प्राप्त केलेली आहे. येणाऱया काळातही ई-कॉमर्स व्यवसाय आणखी तेजी घेणार आहे. या उद्योगाला उज्ज्वल भविष्य आहे.
बाय नाउ, पे लेटर… ग्राहकांची पसंती वाढतेय
वर्ल्डपेने आपल्या 2021 ग्लोबल पेमेंट अहवालानुसार उपलब्ध आणि फ्यूचर पेमेंट्स टेंड्ससाठी 41 देशांचा समावेश केला आहे. यामध्ये भारतात ‘बाय नाउ, पे लेटर’ या ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्याकडे ग्राहकांचा कल वेगाने वाढत जात असून 2020 मध्ये डिजिटल वॉलेट 40 टक्के तर क्रेडिट कार्ड 15 टक्के व डेबिट कार्ड 15 टक्क्यांनी लोकप्रिय होत गेल्याची माहिती देण्यात आली आहे.