4 दिवसात 2 अब्ज डॉलर्सची विक्री ः स्मार्टफोन्सचा 50 टक्के वाटा
वृत्तसंस्था / मुंबई
ई कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांनी अलीकडेच चार दिवस फेस्टिव्ह सेलचे आयोजन ऑनलाईन केले होते. ज्यामध्ये 2.7 अब्ज डॉलर्सची विक्रमी विक्री झाल्याची बाब स्पष्ट झाली आहे. रेडसीर या फर्मने या संदर्भातील माहिती नुकतीच जाहीर केली आहे.
ऑक्टोबर 2 ते 5 या काळामध्ये भरविलेल्या ई कॉमर्सच्या कंपन्यांच्या सेलमध्ये सदरची कामगिरी पार पाडण्यात आली आहे. ऍमेझॉन, फ्लिपकार्ट व इतर ई कॉमर्स कंपन्यांनी सणापूर्वी आकर्षक सवलतीत विविध वस्तू उपलब्ध केल्या होत्या. यामध्ये किराणा कॉमर्स कंपन्यांनाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला. तसेच स्मार्ट फोन्स विक्रीने 50 टक्के इतका वाटा उचलला असल्याचे फर्मने म्हटले आहे. मागच्या वर्षीप्रमाणेच यावर्षी भरविण्यात आलेल्या या सेलला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. यातून 2.7 अब्ज डॉलर्सच्या वस्तूंची विक्री करण्यामध्ये यश मिळाले आहे, असे रेडसिरचे अधिकारी उज्ज्वल चौधरी यांनी सांगितले.
टायर टू, थ्री शहरात मागणी
मोबाईल, मोठी अप्लायन्सेस, सौंदर्य प्रसाधने व उत्पादने आणि फॅशन निगडीत वस्तूंना या सेलमध्ये ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला. टायर टू आणि टायर थ्री शहरातून ई कॉमर्स कंपन्यांच्या फेस्टीव्ह सेलला उत्तम प्रतिसाद लाभला. फ्लिपकार्टला यंदा आपल्या व्यवसायामध्ये 40 टक्के विकास साधता येणार असल्याचा अंदाज आहे.