कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत निर्णय : संरक्षण खात्याकडे मंजुरीसाठी प्रस्ताव
प्रतिनिधी /बेळगाव
सध्या संगणकीय प्रणालीचा वापर करण्यावर भर देण्यात आला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कामकाजही ई-छावणी या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत आहे. ई-छावणी संगणकीय प्रणालीद्वारे घरपट्टी भरणाऱया मालमत्ताधारकांना आणि विविध शुल्क भरणाऱया नागरिकांना 5 टक्के सवलत देण्याचा निर्णय कॅन्टोन्मेंट बोर्डने घेतला आहे.
जास्तीस जास्त नागरिकांनी व व्यावसायिकांनी विविध शुल्क आणि घरपट्टी वेळेत भरावी, यासाठी विविध योजना राबविल्या जातात. महापालिकेच्यावतीने एप्रिल महिन्यात घरपट्टी भरणाऱया मालमत्ताधारकांना 5 टक्के सवलत दिली जाते. याच पद्धतीने आता कॅन्टोन्मेंटनेदेखील मालमत्ताधारकांना सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विविध व्यवसायांचे शुल्क वेळेत भरल्यास सवलत देण्याचा निर्णय दि. 23 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र हे शुल्क ऑनलाईनद्वारे भरणे बंधनकारक आहे. विविध व्यावसायिक शुल्क, कर आणि घरपट्टी ई-छावणी प्रणालीद्वारे भरल्यास 5 टक्मक्मयांपर्यंत सवलत दिली जाणार आहे.
ऑनलाईनद्वारे घरपट्टी अथवा विविध शुल्क भरणाऱयांना 2 टक्के सवलत देण्याचा विषय दि. 23 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीच्या अजेंडय़ावर घेण्यात आला होता. कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष ब्रिगेडियर रोहित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. सदर सवलत कमी असल्याने ती वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. ई-छावणीद्वारे चालू आर्थिक वर्षाची घरपट्टी, कर आणि शुल्क भरणाऱयांना 5 टक्क्मयांपर्यंत सवलत देण्यास काहीच हरकत नाही, असा प्रस्ताव अध्यक्षांनी मांडला. त्यामुळे 5 टक्के सवलत देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. याबाबतचा ठराव मंजूर करून संरक्षण खात्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. संरक्षण खात्याने याबाबत अधिसूचना जारी केल्यानंतर याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे ई-छावणीद्वारे विविध कर भरणाऱया नागरिकांना 5 टक्के सवलतीचा लाभ मिळणार आहे.