प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध राज्य व केंद्रशासित प्रदेशामधून तसेच महाराष्ट्र राज्याच्या इतर जिह्यातून 17 मे अखेर ई-पास वगळता 25641 नागरिकांनी चेक पोस्टवरुन सातारा जिह्यात प्रवेश केला आहे.
यामध्ये देशातील आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, ओडिसा, कर्नाटक, केरळा, गुजरात, गोवा, झारखंड, तामीळनाडू, तेलंगणा, दादरा आणि नगर हवेली, पंजाब, पश्चिमबंगाल, बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली आणि हरियाना मधून 1741 नागरिकांनी प्रवेश घेतला आहे. तर 23900 हे राज्यातील इतर जिह्यातून आले आहेत.
सातारा जिह्यात प्रवेश करुन विविध तालुक्यात गेलेल्यांची संख्या तालुका निहाय पुढीलप्रमाणे- कराड-3296, कोरेगाव-1470, खंडाळा-1104, खटाव-3119, जावळी-1470, पाटण-2562, फलटण-2172, महाबळेश्वर- 1401, माण-2372, वाई-1930 व सातारा तालुका-4745 अशा एकूण 25641 नागरिकांनी विविध तालुक्यात प्रवेश केला आहे.
लॉकडाऊनमध्ये गोडोलीत फ्लॅट फोडून सव्वा लाखाचा ऐवज लंपास
सातारा प्रतिनिधी
गोडोली (सातारा) येथील बंद फ्लॅटच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून फ्लॅटमधील सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल व रोकड असा 1 लाख 22 हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरटय़ांनी लंपास केला. ही घटना दि. 19 रोजी सकाळी 11 वाजता उघडकीस आली. लॉकडाऊनमध्येच घरफोडी झाल्याने गोडोली परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, व्यवसायाने डॉक्टर असलेल्या अगंध लक्ष्मण नलावडे (मूळ रा. नलावडेवाडी तारगाव, ता. कोरेगाव) यांचा गोडोली येथील मंगलमूर्ती बिल्डींगमध्ये ए 8 फ्लॅट आहे. दि. 3 एप्रिल 2020 ते दि. 19 मे दरम्यान या बंद फ्लॅटच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरटय़ाने आत प्रवेश केला. यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा 1 लाख 22 हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरटय़ाने चोरून नेला. याप्रकरणी अगंध नलवडे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास सपोनि मोरे करीत आहेत. दरम्यान, जिह्यात 23 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वच लोक आपल्या घरात थांबून आहेत मात्र लॉकडाऊन काळातच घरफोडी झाल्याने गोडोलीतील लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.