नवी दिल्ली / वृत्तसंस्था
ई-रुपी (e-RUPI) या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवार, 2 ऑगस्ट रोजी व्हर्च्युअल पद्धतीने लॉन्चिंग केले जाणार आहे. ई-रुपी हे प्रीपेड ई-व्हाऊचर असून ते ‘एनपीसीआय’ने विकसित केले आहे. ई-रुपीचा वापर हा केंद्र सरकारच्या अनेक योजनांसाठी केला जाऊ शकतो. त्यामध्ये आरोग्य विभागाच्या अनेक योजना आहेत, लाभार्थ्यांना अनुदान देण्याच्या योजना आहेत. तसेच खासगी क्षेत्रातील कर्मचारीही याचा वापर करू शकतात.
या प्रणालीच्या माध्यमातून केलेले पेमेंट पूर्णपणे कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस होईल. यात क्मयूआर कोड किंवा एसएमएस स्ट्रिंग आधारित ई-व्हाऊचर व्यवस्था असल्यामुळे मोबाईलच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचवला जातो. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपल्या यूपीआय प्लॅटफॉर्मवर ई-रुपी सेवेची सुरुवात केली आहे. त्यासाठी अर्थ विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाची मदत घेण्यात आली आहे.