मुंबई / ऑनलाईन टीम
वसंतऋतुच्या आगमनासोबत सुरू होणारं मराठी नववर्ष आणि त्यानिमित्ताने साजरा होणारा गुढीपाडव्याचा सण सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो. मनातील नवनिर्मितीच्या कल्पनांना चैत्रपालवीची संजीवनी मिळो. जीवनात यशाच्या उंच गुढ्या उभारण्याची स्वप्ने पूर्ण होवोत. यशाच्या त्या उंच गुढ्यांमध्ये एक गुढी ‘करोनामुक्ती’च्या विजयाचीही असो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला सोशल मीडियाच्या माध्यमातून गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मराठी संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेला गुढी पाडव्याचा सण सर्वांनी आनंदात, उत्साहात, कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करून साजरा करावा, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
यासोबतच आजच अजित पवार यांनी शरद पवार यांची ब्रीच कँडी रुग्णालयात भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. यावेळी देखील त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.