राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी / कराड
उदयसिंह पाटील हे कराड दक्षिणमधील काँग्रेसचे नेते आहेत. त्यांच्याविषयी आदर आहे. मात्र कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत त्यांच्या गटाने संस्थापक पॅनेलला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. तो खेदाचा असून व्यक्तिगत आहे. कारखान्याच्या निवडणुकीचा पक्षीय संबंध नसल्याचे सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
कृष्णा कारखाना निवडणुकीसाठी यशवंतराव मोहिते रयत पॅनेलच्या उमेदवारांची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते व उमेदवार उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्ते व सभासदांच्या इच्छेखातर कारखान्यात अविनाश मोहिते व इंद्रजित मोहिते यांचे एकत्रित पॅनेल असावे, यासाठी पुढाकार घेनला. त्यादृष्टिने दोन्ही बाजूंनी प्रामाणिक प्रयत्न करण्यात आले. अनेक दिवस चर्चा झाली. यात अडथळे होते. दुर्देवाने हे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. याची काही कारणे आहेत, ती सांगू शकत नसल्याचे सांगत विश्वजित कदम यांनी या विषयी अधिक बोलणे टाळले.
कराड, वाळवा आणि कडेगाव तालुक्यावर प्रामुख्याने कारखान्याची निवडणूक आहे. वाळवा तालुक्यात अनेक पक्षांचे नेते, कार्यकर्ते तिन्ही पॅनेलमध्ये आहेत. त्यामुळे सहकारातील ही निवडणूक पक्षीय स्तरावर नाही. दिवंगत ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते, स्वर्गीय प्रेमलाकाकी चव्हाण, आनंदराव चव्हाण यांचा विचार अधिक रूजवण्यासाठी रयत पॅनेल काँग्रेस विचारांचे पॅनेल असणार आहे.
मदनराव मोहितेंची भूमिका वैयक्तिक
डॉ. इंद्रजित मोहिते यांना मदनराव मोहितेंच्या भूमिकेविषयी विचारले असता ते म्हणाले, मदनदादा हे कारखान्यावर प्रेम करणारे आहेत. मध्यंतरी त्यांनी का निर्णय घेतला, हे माहित नाही. त्यांच्या व्यक्तिगत कारणांनी त्यांनी ते पाऊल उचलले आहे. आमची भाऊंच्या विचारांवर तसेच कारखाना, सभासद, कर्मचारी यांच्यावर निष्ठा असून त्या विचारानेच आपण कार्यरत आहोत.
गटांपेक्षा कारखाना आणि शेतकरी केंद्रीत विकासासाठी ते मनोमिलन
2009 साली मोहिते आणि भोसलेंचे मनोमिलन व्हावे, यासाठी आपण पुढाकार घेतला. अजूनही त्यासाठी आग्रही आहे. मोहिते व भोसले अशा गटावर विचार केंद्रीत न होता कारखाना, शेतकरी, ऊस दरावर विचार केंद्रीत व्हावा, यासाठी ते मनोमिलन सुचवले होते. दुदैवाने ते झाले नाही. या विचारासाठी आम्ही आजही आग्रही असल्याचे डॉ. मोहिते यांनी सांगितले. ते हात झटकून गेले. त्याला आम्ही काही करू शकत नाही. जे येतील त्यांना बरोबर घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचेही ते म्हणाले.
कराड दक्षिण काँग्रेसचे सरचिटणीस पैलवान नानासाहेब पाटील, जखिणवाडीचे माजी नगरपालिकेचे बांधकाम सभापती राजेंद्र यादव, पंचायत समितीचे सदस्य उत्तमराव पाटील, सदस्य नामदेव पाटील, कृष्णेचे माजी संचालक बाळासाहेब जगताप, राजेंद्र चव्हाण यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण समर्थक यावेळी उपस्थित होते.