10 हजारांचा दंड भरण्यासंदर्भात मडगाव पालिकेकडून नोटीस जारी
प्रतिनिधी / मडगाव
मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी दुकानमालक आणि अन्य व्यापाऱयांना दुकानांसमोर उघडय़ावर कचरा टाकणे पालिकेकडून सहन केले जाणार नाही असा एक कडक संदेश पाठविला आहे. रस्त्याच्या कडेला बेकायदेशीररीत्या कचरा टाकल्याबद्दल दहा हजार रुपयांचा दंड भरण्यासंदर्भात फर्नांडिस यांनी बुधवारी एका दुकानमालकाला नोटीस बजावली आहे.
इतकेच नव्हे, तर या नोटिसीत मुख्याधिकाऱयांनी 10 हजारांची दंडाची रक्कम पालिकेला फेडली गेली नाही, तर सर्व प्लास्टिक कचरा सदर दुकानमालकाच्या दुकानासमोर टाकण्यात येईल, असा इशारा दिला आहे. सदर दुकानमालकाने कचरा बेकायदेशीरपणे टाकलेला असताना तो आपण टाकला नसल्याचा दावा केला आहे. मात्र पालिकेने केलेल्या तपासणीत तो कचरा त्याचाच असल्याचे आढळून आले आहे. मुख्याधिकाऱयांनी दोषींना सोडले जाणार नाही असा इशारा देताना सांगितले आहे की, दुकानाबाहेर कचरा टाकल्याने पालिका घनकचरा व्यवस्थापन नियम, 2016 चे आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 5 चे उल्लंघन होते.
कचरा टाकणाऱया वाहनाचा मालक सापडला
दरम्यान, मुख्याधिकाऱयांनी सांगितल्यानुसार, गेल्या महिन्यात चंद्रावाडो-फातोर्डा येथे उपाहारगृहाचा कचरा टाकण्यास जबाबदार असलेल्या पिकअप व्हॅनच्या वास्तविक मालकास पालिकेने हुडकून काढले आहे. वाहनाच्या मूळ मालकाने दावा केला आहे की, त्याने आधीच मडगाव येथील एका व्यक्तीला सदर पिकअप व्हॅन विकली होती. या मालकास सुनावणीसाठी बोलावण्यात आले असता त्यामध्ये त्याने त्याचे वाहन या प्रकारात गुंतले असल्याचे कबूल केले. पिकअप व्हॅनमालकाने 10 हजार रुपयांची दंडाची रक्कम कमी करण्याची विनंती केली आहे.