साडेसात तोळे सोन्याचे दागिने लंपास : कुटुंबीय कार्यक्रमाला गेल्याने साधली संधी
वार्ताहर /उचगाव
उचगाव येथील मठ गल्लीतील एका राहत्या घरामध्ये दिवसाढवळय़ा अज्ञातांनी धाडसी चोरी करून साडेसात तोळे सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.
उचगाव-गोजगे मार्गावरील मठ गल्लीमध्ये राहणारे रघुनाथ परशराम लाळगे हे तुरमुरी येथील आपल्या मुलीच्या घराच्या वास्तुशांती कार्यक्रमासाठी सकाळी गेले होते. ही संधी साधत चोरटय़ांनी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास समोरच्या दरवाजाचा कुलूप खोलून आत प्रवेश केला आणि कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त करून टाकले. तसेच तिजोरी फोडून साडेतीन लाख रुपये किमतीचे साडेसात तोळे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत.
रघुनाथ लाळगे हे सायंकाळी वास्तुशांती कार्यक्रम आटोपून घरी आले असता दरवाजा आणि आतील तिजोरी खुली असल्याचे दिसून आले. लागलीच त्यांनी या घटनेची माहिती काकती पोलीस स्थानकाला दिली. पोलीस स्थानकाचे सीपीआय राघवेंद्र हळ्ळूर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. भरदिवसा घर फोडून चोरी झाल्याने मठ गल्ली भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.
रघुनाथ लाळगे यांनी ‘तरुण भारत’ला माहिती देताना सांगितले की, सदर चोरी नियोजनबद्धरीत्या केली आहे. याच मार्गावर यापूर्वी देखील अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. गोजगा भागात गावठी दारूचा सुळसुळाट होत असल्याने या मार्गे ये-जा करणाऱयांची संख्या मोठी आहे. अशा एखाद्या व्यक्तीने पाळत ठेवून ही चोरी केली असावी, असा काही नागरिकांचा अंदाज आहे. या मार्गावरून ये-जा करणाऱया अशा नागरिकांवर पाळत ठेवून घटनेचा तातडीने छडा लावावा, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.