उचगाव / वार्ताहर
उचगाव ता.करवीर येथील माळीवाड्यानजीक पुणे बेंगलोर महामार्गावर ट्रक पलटी झाल्याने पुणे-बेंगलोर महामार्गासह तावडे हॉटेल चौकात वाहतुकीची बुधवारी सायंकाळी कोंडी झाली. त्यामुळे वाहनचालकांची काही काळ गैरसोय झाली. मात्र गांधीनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे आपत्कालीन स्थितीमध्ये केलेल्या उपाययोजनांमुळे वाहतूक सुरळीत झाली.
गांधीनगर बाजारपेठेत गणेश चतुर्थीच्या पूर्वतयारीच्या खरेदीसाठी ग्राहकांनी केलेली गर्दी तसेच सजावटीच्या साहित्य खरेदीसाठी गांधीनगर बाजारपेठेत गर्दी वाढत आहे.बाजारपेठेतील रस्ते वाहने व ग्राहकांनी फुलले आहेत. सर्वत्र गर्दीच गर्दी होत आहे. त्यातच सायंकाळी उचगाव (ता करवीर) येथील माळीवाड्यानजीक महामार्गावर असणाऱ्या पुलाजवळ दुचाकी स्वार आडवा आल्याने ट्रक (आर जे 39- जीए 438) ट्रक पलटी झाला सुदैवाने जीवित हानी झाली नाही.
ट्रक पलटी झाल्याने महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. त्याचा परिणाम तावडे हॉटेल चौकातील वाहतुकीवर झाला शिरोली कडून येणारी शिरोली कडून कोल्हापूर कडे जाणारी कोल्हापूरकडे व बेळगावकडे जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी गांधीनगर पोलिसांनी प्रयत्न केले.