उचगाव / वार्ताहर
उचगाव पैकी मणेरमळा महालक्ष्मीनगर (ता.करवीर) येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी चंद्रकांत उर्फ बाबू अबंऋषी जगताप यांच्या घरातील रोख रकमेसह सोन्याचे दागिने असे एकूण दोन लाख एकोणीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना रविवारी रात्री उशिरा उघडकीस आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी चंद्रकांत जगताप हे आपल्या कुटुंबीयांसोबत महाबळेश्वर येथे फिरायला गेले होते. ते रविवारी रात्री परत आल्यानंतर घराचे कुलूप तुटले असल्याचे लक्षात आले. त्यांना घरात जाऊन बेडरूममधील कपाट फोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कपाटातील ९० हजाराची रोख रक्कम व एक लाख २९ हजाराचे सोन्याचे दागिने असे एकूण दोन लाख १९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञाताने लंपास केले. त्यामध्ये सोन्याच्या अंगठ्या, कानातील टॉप्स, कर्णफुले, पँन्डाल , गंठण, चेन, असे एकूण सुमारे दोन लाख १९ हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. याबाबतची फिर्याद चंद्रकांत उर्फ बाबू अंबऋषी जगताप यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले करीत आहेत.