आरोग्य खात्यात भीतीचे वातावरण : नागरिकांचा वावर मात्र बिनधास्त
वार्ताहर / उचगाव
उचगाव येथे एकाच दिवशी कोरोना पॉझिटिव्हचे 12 रुग्ण आढळल्याने गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, नागरिक बिनधास्तपणे फिरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मंगळवार दि. 3 मे रोजी आरटीपीसीएल तपासणीमध्ये 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नागरिक तसेच आरोग्य खात्यामध्ये एकच खळबळ माजली आहे.
सध्या कोरोनाचे प्रस्थ सर्वत्र वाढतच असल्याने तसेच मुब्ंाई, पुणे येथून आलेल्या मंडळीकडून याची लागण गावामध्ये होत आहे. बाहेरून आलेले नागरिक लपून छपून गावामध्ये राहत असल्याने कोरोनासारख्या आजाराचा फैलाव सर्वत्र पसरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील महिन्यामध्ये झालेल्या लक्ष्मी यात्रा तसेच सध्या सुरू असलेली लग्नसराई, छोटे-मोठे घरगुती कार्यक्रम अशा अनेक माध्यमातून लोकांची ये-जा वाढल्याने या रोगाचा फैलाव झाला असावा अशी चर्चा आहे.
मागील वर्षी एकच रुग्ण कोरोनाचा आढळला आणि संपूर्ण गाव लॉकडाऊन केले. सर्वांनाच बंदी घातली. मात्र, सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अद्याप नागरिकांनी म्हणावी तशी काळजी घेतल्याचे चित्र दिसून येत नाही. गावामध्ये बाहेरून येणाऱयांची संख्या वाढतच आहे. कोरोनाची भीती नसल्यासारखे बिनधास्त वावरत आहेत. मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, स्वच्छता याकडे म्हणावे तसे लक्ष दिले जात नाही.
लग्नसराईमध्ये लोकांची वाढलेली गर्दी, सुरक्षित अंतर, याचबरोबर डॉल्बी, बँड बाजा यांचा वापर सर्रास सुरूच आहे. अतिवाड, बेकिनकेरे, तुरमुरी, कल्लेहोळ, सुळगे, गोजगे, मण्णूर, आंबेवाडी येथे हळदी समारंभाला बिनधास्तपणे डॉल्बीचे आवाज येत आहेत. या भागातील सर्व ग्रा. पं. नी तातडीने यावर निर्बंध लादणे गराजेचे आहे. उचगाव येथील आरोग्य खाते शर्थीचे प्रयत्न करून रुग्णांना योग्य ती सुविधा देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. या केंद्रातून कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी सर्वांना सांगण्यात येत होते. त्यावेळी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली नाही. मात्र सध्या लसीचा तुटवडा असताना लोक आरोग्य केंद्रामध्ये लसची मागणी करण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे आरोग्य खात्यावरही सध्या ताण येत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी उचगाव ग्रा. पं. आरोग्य खाते, पोलीस खाते या सर्व शासनाने तातडीने उपाययोजना करून या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी सज्ज राहिले पाहिजे, असे सध्या या भागातील नागरिकांतून बोलले जात आहे.
तुरमुरी येथे पाच जणांना कोरोनाची लागण : रोजगाराच्या दोन महिलांचा समावेश
सध्या कोरोना रोगाने सर्वत्र थैमान घातले असून तुरमुरी येथे पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये दोन रोजगाराच्या महिलांचा समावेश आहे. त्यामुळे आजपासून सर्व रोजगाराची कामे बंद करण्यात आली आहेत आणि कोरोनाची लागण झालेल्यांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे.
ग्रामीण भागात सध्या सर्वत्र रोजगाराची कामे जोमात सुरू आहेत. एकीकडे कोरोनाचा फैलाव मोठय़ा प्रमाणावर होत असताना महिला रोजगार कामासाठी आक्रमक झाल्या आहेत. कोरोनाचे प्रमाण खूप वाढलेले आहे. तुरमुरी येथे चार महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये दोन रोजगार महिलांचा समावेश आहे.
आज सकाळी सर्व महिला रोजगारासाठी गेल्या होत्या. मात्र, सदर महिलांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे तात्काळ रोजगाराचे काम बंद करण्यात आले आणि कोरोना रुग्णांना होमक्वारंटाईन करण्यात आले.
जनता कॉलनी येथे चार जण असून वेंगुर्ला रोड येथे एक आहे. दुपारनंतर रोजगाराचे काम बंद करण्यात आले. उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत त्यांना औषधोपचार करण्यात येत आहे. याविषयी तुरमुरी ग्रा. पं. विकास अधिकारी आणि ग्रा. पं. च्या अध्यक्षा यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन होमक्वारंटाईनचा सल्ला दिला. त्याशिवाय सध्या कडक लॉकडाऊन असताना नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा. कामाव्यतिरिक्त कोणीही घराबाहेर पडू नये, तसेच लॉकडाऊनच्या काळात कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.