हेस्कॉम कर्मचाऱयांची तत्परता : परिसरातील जनतेतून समाधान
वार्ताहर /उचगाव
गेल्या दोन दिवसांमध्ये परिसरात झालेल्या चक्रीवादळाचा आणि मुसळधार पावसाचा मोठा फटका हेसकॉमला बसला आहे. यामध्ये 19 इलेक्ट्रिक खांब मोडले तर अनेक भागातील वीजतारा निरुपयोगी झाल्याने दोन-अडीच लाखांचा फटका बसला. शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास खंडित झालेला वीजपुरवठा मोठी पराकाष्ठा करत अवघ्या सहा तासात पूर्ववत केल्याने नागरिकांतून कर्मचारीवर्गाबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
उचगाव परिसरामध्ये शुक्रवारी आणि शनिवारी सायंकाळी जोरदार चक्रीवादळाचा तडाखा बसून अनेक नागरिकांची घरे व वृक्षांची मोठी हानी झाली. उचगाव सेक्शन कार्यालय कार्यक्षेत्रातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी हेसकॉम कर्मचाऱयांनी युद्धपातळीवर काम करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. रात्री अंधारामध्ये शेतवडीतील चिखल त्याचबरोबर मोठे वृक्ष बाजूला सारून वीजतारा जोडण्यात ते यशस्वी ठरले. अनेक ठिकाणी रात्रीच्या अंधारात ये-जा करणे, बिघाड कुठे आहे तो शोधून काढणे अशा अनेक कठीण बाबींशी सामना करत हेस्कॉम कर्मचाऱयांनी जनतेची काळजीपूर्वक सेवा करण्याचे आपले व्रत दाखवून दिले आहे. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत
आहे.
हेस्कॉमची कार्यतत्परता
काही गावांतील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी त्यांना अनेक अडचणी निर्माण झाल्या. मात्र, उचगाव, बेकिनकेरे भागातील वीजपुरवठा अनेक कठीण प्रसंगांशी सामना करत सुरू केला. त्याबद्दल जनतेतून त्यांचे आभार मानण्यात येत आहेत. यासाठी उचगाव हेस्कॉमचे सेक्शन ऑफिसर सचिन मोहन तसेच आमरोळकर आदींनी उशिरापर्यंत काम करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश मिळविले. यामुळे हेस्कॉम कर्मचाऱयांचे उचगाव परिसरातून आभार मानण्यात येत आहेत.