वार्ताहर /उचगाव
जीजी बॉईज आणि शिवज्योत युवक मंडळ गणपती गल्ली उचगाव यांच्या विद्यमाने आयोजित केलेल्या 52 किलो गटाखालील कबड्डी स्पर्धेमध्ये कौलगे येथील कबड्डी संघाने प्रथम क्रमांक, इंचनाळ संघाने द्वितीय क्रमांक मिळविला तर तृतीय क्रमांक देसूर कबड्डी संघाने मिळविला.
बेळगाव जिल्हा तसेच चिकोडी आणि चंदगड, खानापूर तालुक्मयातील अव्वल 23 कबड्डी संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. अंतिम सामन्यातील अटीतटीच्या लढतीत कौलगे आणि इंचनाळ यांच्यात सामना रंगला आणि अखेर कौलगे संघाने बाजी मारली. अंतिम सामन्याचे उद्घाटन मारुती पाटील आणि अंकुश पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या संघांना रोख रक्कम आणि चषक देण्यात आला. प्रथम क्रमांकासाठी ग्रामपंचायत उपाध्यक्षा मथुरा बाळकृष्ण तेरसे व सदस्य बाळकृष्ण तेरसे यांच्याकडून सात हजार एक रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. द्वितीय क्रमांकासाठी ग्रामपंचायत सदस्या स्मिता मारुती खांडेकर यांच्याकडून चार हजार एक रुपये तर भाताचे व्यापारी दिनकर वसंतराव पावशे यांच्याकडून चषक ठेवण्यात आला होता.