उचगाव / वार्ताहर
करवीर तालुक्यातील उचगाव गावाची ५० ते ५५ हजार लोकसंख्या आहे. उचगावमध्ये कोरोना सारख्या आजाराने ही मोठ्या प्रमाणात थैमान घातले असून त्यात भरीतभर म्हणून चिकनगुनिया व डेंग्यूसदृश आजाराने ही मोठ्या प्रमाणात आपले डोके वर काढले आहे. आज खाजगी दवाखान्याच्या दारात मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या असून डेंग्यूसह चिकनगुनिया ह्या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत.
प्रियदर्शनी कॉलनी, मंगेश्वर कॉलनी, रेडेकर गल्ली, मणेर मळा व संपूर्ण गावात कमी-अधिक प्रमाणात साथ पसरली असून तालुका अधिकारी टीम कडून संपूर्ण गावाचा सर्व्हे करावा व लोकांच्या आरोग्य विषयक तपासण्या करण्याची मोहीम हाती घेवून योग्य तो उपचार व जनजागृती करून धूर फवारणी करावी व ही साथ आटोक्यात आणावी या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने डॉ. जी. डी. नलवडे, तालुका आरोग्य अधिकारी,पंचायत समिती, करवीर यांना देण्यात आले.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नलवडे यांनी जिल्हा आरोग्य टीम गावामध्ये पाठवून साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव,उपतालुकप्रमुख दिपक पाटील,युवासेना तालुका प्रमुख संतोष चौगुले, दिपक रेडेकर,बाळासाहेब नलवडे, प्रफुल्ल घोरपडे आदी उपस्थित होते.