वार्ताहर / उचगाव
उचगाव गावातील रस्ते, गटारी, व पेव्हर्स बसविणे अशा विविध विकासकामांसाठी तालुका पंचायतीच्या फंडातून सात लाखाचा निधी मंजूर झाला असून त्याअंतर्गत या कामाचा शुभारंभ ता. पं. सदस्या मथुरा तेरसे यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.
गावातील सुरविर गल्लीमधील दुतर्फा गटारींच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. या गल्लीमध्ये सीसी रोडचे काम पूर्ण करण्यात आले होते. मात्र गटारी नसल्याने पावसाळ्य़ात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होत असे, यासाठी या गटारीचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच अनगोळ गल्लीमध्ये अर्ध्या रस्त्याचे काम पूर्ण झाले होते. उर्वरित रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केल्याने गल्लीतील सीसी रस्त्याला प्रारंभ करण्यात आला. तर तेरसे कॉलनीतील रस्ता खराब झाल्याने पावसाळ्यात चिखल व उन्हाळ्यात धुळीचा सामना करण्याची वेळ नागरिकांवर येत असल्याने या रस्त्यावर पेव्हर्स बसविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
या कामाच्या शुभारंभ ता. पं. सदस्या मथुरा तेरसे यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आला. तर ग्रा. पं. माजी अध्यक्षा योगिता देसाई, उपाध्यक्ष विनोद पावशे, ग्रा. पं. सदस्य बंडू पाटील, भास्कर पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. अडत व्यापारी संदीप होनगेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले.
यावेळी ग्रा. पं. सदस्या लक्ष्मी हावळे, बाळकृष्ण तेरसे, सातेरी कोवाडकर, शामजी कुंडलकर, बाबू कोवाडकर, मल्लू कोवाडकर, एम. आर. कोवाडकर, आप्पाजी सुळगेकर, महेश कुंडलकर, भरमा कोवाडकर, संतोष पाटील, आप्पाजी लाळगे, कॉन्ट्रक्टर एस. एम. हुंदरे उपस्थित होते.